पर्यावरणासाठी हरित रसायनशास्त्र
By admin | Published: December 23, 2014 09:24 PM2014-12-23T21:24:30+5:302014-12-23T23:47:08+5:30
भालचंद्र भणगे : सुरेश कोदे स्मृती व्याख्यानमाला
कणकवली : हरित रसायनशास्त्रावर जगभरात काम सुरू आहे. हरित रसायनशास्त्राची तत्त्वे आयुष्याशी जवळून जोडलेली आहेत. या शास्त्राच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणाचे पर्याय उपलब्ध होतात, असे प्रतिपादन रसायन तंत्रविज्ञान संस्थेचे रसायन विभागप्रमुख प्रा. भालचंद्र भणगे यांनी केले. सुरेश कोदे सायन्स फोरमच्यावतीने वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात व्याख्यानमालेत ते बोलत होते.
प्रा. भणगे यांनी शाश्वत विकासासाठी हरित रसायनशास्त्र ही संकल्पना स्पष्ट केली. हरित रसायनशास्त्राची मूलभूत बारा तत्त्वे समजावून सांगितली.
हरित रसायनशास्त्राच्या संकल्पनेत घातक रासायनिक पदार्थांचा अत्यल्प वापर करणे तसेच टाकाऊ पदार्थ निर्मितीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न होतो. कुठल्याही रासायनिक प्रक्रियेत सुरक्षित व पर्यावरणाला हितकारक पदार्थ वापरण्याकडे लक्ष दिले जाते. रासायनिक प्रक्रियेसाठी कमीत कमी ऊर्जा वापरण्यासह कमी ऊर्जा वापरणाऱ्या प्रक्रिया शोधण्याचा प्रयत्न होतो. हरित रसायनशास्त्राची तत्त्वे आपल्या आयुष्याशी जवळून जोडली गेलेली आहेत. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे हे हरित रसायनशास्त्राच्या तत्त्वानुसार आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे.
यावेळी प्रसाद घाणेकर, वामन पंडित, सुषमा केणी, डॉ. नीलेश कोदे, अशोक करंबेळकर आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेची संकल्पना डॉ. नीलेश कोदे यांनी स्पष्ट केली.
स्वागत वामन पंडित यांनी केले. (प्रतिनिधी)