ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला जनतेचा विरोध, सेना स्थानिकांच्या पाठीशी : अरुण दुधवडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:08 PM2017-12-15T17:08:56+5:302017-12-15T17:11:51+5:30
ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. या प्रकल्पाला शिवसेनेचा कायमच विरोध राहील, असे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देवगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, शहरप्रमुख संतोष तारी, लक्ष्मण तारी उपस्थित होते.
देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. या प्रकल्पाला शिवसेनेचा कायमच विरोध राहील, असे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देवगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, शहरप्रमुख संतोष तारी, लक्ष्मण तारी उपस्थित होते.
ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा कायम विरोध राहील. स्थानिक लोकांचा या प्रकल्पाला विरोध असून शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी राहील. मच्छिमारी व्यवसायावर या प्रकल्पाचा नक्कीच परिणाम होणार आहे, असे अरुण दुधवडकर यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड व कणकवली तालुक्यांतील निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला.
शिवसेना सर्व ताकदीनिशी तालुक्यातील सातही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उतरली असून सेनेला चांगले वातावरण आहे. एक-दोन ठिकाणी गाव पॅनेलबरोबर तर उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये स्वबळावर निवडणूक लढवित आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत देवगड तालुक्यातील दौऱ्यात देवगड-आनंदवाडी प्रकल्पाविषयीची वस्तुस्थिती ही मच्छिमारांचे संस्था प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचेही ते म्हणाले. शिवशाही एस. टी. सेवेबरोबरच साधी परिवहन सेवा लांब पल्ल्याकरीता सुरू रहावी. त्यात ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करणार असल्याचेही दुधवडकर यांनी सांगितले.
शिवसेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार
आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून धनुष्यबाण हाच आमचा उमेदवार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर पंचायत समितीनिहाय तालुक्यातील प्रत्येक शाखाप्रमुख व महिला शाखाप्रमुखांची बैठक घेणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार व त्यानंतर संघटना बांधणीवर भर देणार आहे.
गावागावात शिवसेनेचे असलेले नेटवर्क आणखीन मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. फयान वादळाच्या निकषाप्रमाणेच ओखी वादळात नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.