भुईबावड्यात घरफोड्या करणारा रंगेहात जाळ्यात
By admin | Published: November 18, 2015 11:33 PM2015-11-18T23:33:04+5:302015-11-19T00:45:08+5:30
तीन ठिकाणी चोरी : मुद्देमाल हस्तगत
वैभववाडी : भुईबावडा पंचक्रोशीतील एका गावात मंगळवारी भरदिवसा तीन घरफोड्या झाल्या. चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून भुईबावडा दूरक्षेत्रातील पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरट्याकडून मुद्देमाल हस्तगतही केला. मात्र, चोरट्याविरुद्ध कारवाई करण्याचे टाळून राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले. या गंभीर प्रकाराबाबत वैभववाडी पोलीस अनभिज्ञ होते, परंतु या गंभीर प्रकाराची चर्चा तालुक्यात जोरात असून, पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
भुईबावडा पंचक्रोशीतील एका गावात मुंबईस्थित तरुणाने स्वत:च्या गावातील तीन बंद घरे फोडली. त्यापैकी दोन घरमालक माध्यमिक शिक्षक आहेत. एका शिक्षकाच्या दरवाजाची कडी तोडत असतानाच त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने चोरट्याला रंगेहात पकडले. त्यानंतर भुईबावडा दूरक्षेत्रात संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे तेथील पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. चोरट्याकडून सोन्याच्या डझनभर अंगठ्या आणि दोन चेन हस्तगत केल्या.
दिवाळीच्या सुटीनिमित्त हे शिक्षक गावी गेले होते. या संधीचा चोरट्याने फायदा घेतला. मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना गावाहून तत्काळ बोलावून घेतले. चोरटा गावातीलच असल्याने राजकीय वजन कामी आले. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी मांडवली करण्यात आली. शिक्षक गावाहून येताच चोरलेले दागिने मूळ मालकांना परत करून पोलीस आपल्या मुख्यालयी निघून गेले. या घटनेला तीस तास उलटले तरी वैभववाडी पोलीस ठाण्यात या गंभीर प्रकाराची यत्किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. (प्रतिनिधी)