वाढत्या उष्म्याने पर्यटन हंगाम मंदावला

By admin | Published: March 7, 2017 09:58 PM2017-03-07T21:58:18+5:302017-03-07T21:58:18+5:30

रेडी समुद्र किनाऱ्यावरील गर्दी ओसरली : परदेशी पर्यटक परतीच्या वाटेवर

Growing heat exhausted tourist season | वाढत्या उष्म्याने पर्यटन हंगाम मंदावला

वाढत्या उष्म्याने पर्यटन हंगाम मंदावला

Next

बाळकृष्ण सातार्डेकर --रेडी --महाशिवरात्री झाल्यानंतर रेडी परिसरातील समुद्रावरील उन्हाळी उष्म्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याने समुद्रकिनारी येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या घटत आहे. यावर्षी रेडी समुद्र किनाऱ्यासह वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच किनारे पर्यटकांनी बहरून गेले होते. आता वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या पर्यटकांनी भारत सफरीचा आनंद लुटून स्वगृही जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यावर्षीचा रेडी परिसरातील पर्यटन हंगाम डिसेंबर ते फेबु्रवारीपर्यंत तेजीत चालला. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही येथे देशी पर्यटकांबरोबर डिसेंबरपासून विदेशी पर्यटकांनी हजेरी लावल्याने समुद्रकिनारी पर्यटकांची मांदियाळी दिसून येत होती. मात्र, सध्या उन्हाळा तीव्र प्रमाणात जाणवत असल्याने पर्यटन हंगाम मंदावत आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामस्थांनासुध्दा तीन महिने का असेना, रोजगार मिळाल्याचा सूर व्यावसायिकांमधून उमटत आहे.गोव्याप्रमाणे रेडी ते कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यापर्यंत पर्यटनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या रेडी येथील यशवंतगड, मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला, डॉल्फिन दर्शन, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग यासारखे जलक्रीडा प्रकार यांची भुरळ देशी-विदेशी पर्यटकांना पडू लागली आहे. येथील पर्यटन हंगाम सध्या बारमाहीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून पर्यटन हंगाम बहरायला सुरुवात होते. मात्र, केंद्रशासनाने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आणि याचा फटका सिंधुदुर्गातील मुख्य पर्यटन व्यवसायाला बसला. यामुळे पर्यटकांसह पर्यटन व्यावसायिकही हतबल झाले होते. नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याने सुरुवातीचे पंधरा दिवस तर जनजीवन विस्कळीत झाले होते. नोटाबंदीच्या निर्णयाच्या परिणामाची झळ गोव्याप्रमाणेच सिंधुदुर्गातीलही पर्यटनस्थळांना चांगली बसली होती. त्यामुळे आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांच्या संख्येत मोठी घट आली होती. रेडी ते कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यांचा विचार करता आॅक्टोबरपासून आगाऊ बुकिंग करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही घट झाली होती. शनिवार, रविवार सुटीच्या दिवसांतही पर्यटनस्थळी म्हणावी तशी गर्दी दिसून येत नसल्याचे चित्र मागील काळात दिसत होते.
यावर्षी रेडी-शिरोडा, वेळागर पॅराडाईज बीच परिसरात रशिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी येथील पर्यटकांनी नैसर्गिक पर्यटनाचा आनंद लुटला. येथील किनारपट्टी म्हणजे निसर्गसौंदर्याने नटलेली खाण आहे. येथील समुद्र किनारी गोव्यापेक्षा शांतता, स्वच्छता तसेच येथील स्थानिक ग्रामस्थांकडून मिळणारी आपुलकी, प्रेम, मार्गदर्शन, विश्वास व स्वागत करण्याची पद्धत चांगली असते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी रेडी-शिरोडा किनारपट्टी परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतो, अशी प्रतिक्रिया देशी-विदेशी पर्यटकांतून व्यक्त होत आहे. या परिसरातील ग्रामीण जीवन पद्धतीत माणसे कशी राहतात, आपले जीवन कसे व्यतीत करतात, याचे विदेशी पर्यटक निरीक्षण करून, आपल्या कॅमेऱ्यामध्ये चित्रण करून येथील जीवन पद्धतीचा अभ्यास करताना दिसतात.
गोवा व महाराष्ट्राच्या सीमेवर औद्योगिक व पर्र्यटनदृष्ट्या प्रगतिपथावर वसलेले वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गसंपन्न रेडी गाव जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. येथील ग्रामदैवत स्वयंभू श्री देवी माउली देवस्थान, स्वयंभू द्विभूज महागणपती, सप्तेश्वर महादेव मंदिर, सिध्देश्वर मंदिर तसेच स्वच्छ सुंदर रमणीय समुद्रकिनारा, शिवकालीन यशवंतगड, गुहा, जाते, दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर, रामपुरुष मंदिर, नवदुर्गा मंदिर, विठोबा-रखुमाई मंदिर, साईबाबा मंदिर, कर्पेवाडीतील स्वामी समर्थ मंदिर, रेडी बंदर, रेडी गावच्या प्रवेशद्वारावर वसलेले सत्यपुरुष मंदिर, शिरोडा-वेळागर समुद्रकिनारा, आरवली वेतोबा मंदिर, शिरोडा माउली मंदिर यांचे देवदर्शन घेऊन डिसेंबर ते फेबु्रवारी या कालावधीत पर्यटक पर्यटनाची मजा लुटतात.


पर्यटकांना यंदा मिळाल्या सुख-सुविधा
रेडी परिसरात बाजारपेठ तसेच समुद्र किनाऱ्यापर्यंत सुसज्ज असे रस्ते आहेत. दूरध्वनी, इंटरनेट सेवा, भ्रमणध्वनीच्या विविध कंपन्यांच्या टॉवर्सची सेवा चांगली मिळत आहे. तसेच चलनासाठी पर्यटकांना एटीएम सेवा मिळत आहे. पर्यटकांच्या अपेक्षेप्रमाणे गावात छोटीमोठी घरगुती भोजनालये, न्याहरी सुविधा तसेच राहण्यासाठी वसतिगृह (लॉजिंग) सेवा यंदा चांगली मिळाली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पर्यटन व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आला होता. पण, डिसेंबरनंतर पर्यटन व्यवसाय तेजीत आला. शासनाने युवा पिढीला पर्यटन व्यवसायासंबंधी महाविद्यालयामार्फत मार्गदर्शन केले. तर येथील भावी युवापिढी पर्यटनातून स्वत:चा रोजगार निर्माण करून येत्या काळात आर्थिक सक्षम होऊ शकेल.
- किशोर वारखंडकर
हॉटेल व्यवसायिक, रेडी-म्हारतळेवाडी

Web Title: Growing heat exhausted tourist season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.