शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा आता उंचावणार
By admin | Published: January 14, 2015 09:54 PM2015-01-14T21:54:48+5:302015-01-14T23:35:59+5:30
विशेष घटक योजना : अनुसूचित जातीला मिळणार लाभ
रहिम दलाल - रत्नागिरी --अनुसूचित जातीचे शेतकरी शेतीच्याच माध्यमातून मुख्य प्रवाहात यावेत, त्यांचा आर्थिक दर्जा उंचावला जावा, यासाठी विशेष घटक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या २९५ शेतकऱ्यांचा जिल्हा परिषद कृषी विभागाकडून विकास साधला जाणार आहे़ त्यासाठी या शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येत आहे़
अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शासनाकडून सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे़ तसेच दारिद्र्यरेषेखालील, तसेच ५० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ देण्यात येत आहे़ या योजनेतून शेतकऱ्यांच्या विकासासाठी जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षक औजारे, सुधारित औजारे, बैलजोडी, बैलगाडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पंपसेट, नवीन विहीर, शेततळे, परसबाग, ठिबक संच, ताडपत्री आदींवर १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे़
या योजनेतून शेतकऱ्यांना ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे़ त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्हाभरातून अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागितले होते़ त्यासाठी अनुसूचित जातीच्या २९५ शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देण्यात येणार आहे.या लाभार्थींसाठी शासनाने पावणेदोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी १ कोटी ५ लाख रुपये जिल्हा परिषद कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत़ त्यांचे लाभार्थींना वाटपही करण्यात आले. उर्वरित ७० लाख रुपये शासनाकडून येणे आहेत़ तेही प्राप्त झाल्यावर लाभार्थींना वाटप करण्यात येणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेतून दोन वर्षांत अनुदान देण्यात येते़ या योजनेतून १०० टक्के अनुदान मिळत असल्याने त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो़ या योजनेच्या लाभार्थींची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय निवड समिती कार्यरत आहे़
तालुकाशेतकरी
मंडणगड२९
दापोली४१
खेड३२
चिपळूण ४०
गुहागर३१
संगमेश्वर३७
रत्नागिरी३०
लांजा३७
राजापूर१८
एकूण२९५