व्यापारीवर्गासाठी जीएसटी सोईस्कर : रविराज जाधव
By admin | Published: May 8, 2017 03:36 PM2017-05-08T15:36:53+5:302017-05-08T15:36:53+5:30
देवगड येथे पार पडली जी. एस. टी. कर प्रणालीची पहिली कार्यशाळा
सिंधुदुर्गनगरी, दि. 0८ : जी. एस. टी. करामुळे शासनाची जबाबदारी वाढणार असून व्यापारी वर्गासाठी जी. एस. टी. सोईस्कर होणार आहे तसेच व्यापारी वर्गाला येणा-या अडचणीचा सामना करीत पुढे जाणे आवश्यक असल्याचे मत विक्रीकर विभागाचे विक्रीकर उपायुक्त रविराज जाधव यांनी व्यक्त केले.
जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात जी. एस. टी. कर प्रणाली ज्ञानसागर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू, अरविंद नेवाळकर, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सचिव प्रमोद नलावडे तसेच व्यापारी उपस्थित होते.
जाधव म्हणाले की, प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर हे दोन कर आपल्या रोजच्या व्यवहारात येणारे दोन कर असून जी. एस. टी. चे अप्रत्यक्ष कराच्या रुपात येणार आहे. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आदींकडून वेगवेगळ्या रुपाने कर आकारण्यात येतात. मात्र जी. एस. टी.च्या रुपाने सर्व कर एकाच ठिकाणी आकारले जाणार आहेत. यामध्ये करमणूक कर देखील रद्द होऊन त्याचे रुपांतर जी. एस. टी. मध्ये होणार असून व्यापारी वगार्ला विविध ठिकाणी नोंदणी करावी लागणार नसून एकाच ठिकाणी नोंदणी करावी लागाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटी अंतर्गत नोंदणी, रिटर्न भरणे, ई- सर्व्हिसेस या बाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
वळंजू म्हणाले की, जी. एस. टी. सारखी कर प्रणाली येतच राहणार आहेत, त्यासाठी कुठल्याही व्यापारी वर्गाने डगमगून जाता कामा नये. यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
नेवाळकर म्हणाले की, जिल्ह्यातील जी. एस. टी. कर प्रणालीचे पहिले ज्ञानसत्राचे आयोजन देवगड व्यापारी संघाने केले आहे. तसेच व्यापारी वगार्ने देवाण घेवाण करताना वॅट नंबर देणे आवश्यक असून बिलावर वॅट नंबर असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले.