अधीक्षकांकडून रक्कम मिळण्याची हमी
By admin | Published: November 6, 2015 10:58 PM2015-11-06T22:58:59+5:302015-11-06T23:36:57+5:30
कोनाळकट्टा पोस्ट अपहारप्रकरण : ठेवी मिळण्यासाठी दुसऱ्या दिवशीही खातेदारांची गर्दी
दोडामार्ग / कसई दोडामार्ग : तालुक्यातील कोनाळकट्टा येथील पोस्ट कार्यालयात झालेल्या अपहार प्रकरणी शुक्रवारी खातेदारांनी पोस्ट कार्यालयात एकच गर्दी केली. आपले पैसे लागलीच मिळावेत, यासाठी सहाय्यक अधीक्षक अर्जुन इंगळे यांना खातेदारांनी घेराव घातला. शेकडो खातेदारांच्या उपस्थितीने इंगळे गोंधळून गेले. खातेदार आपली रक्कम मिळणार की नाही, या शंकेने भांबावून गेले. सर्व खातेदारांचे पैसे देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन इंगळे यांनी दिल्यानंतर खातेदार शांत झाले.
कोनाळकट्टा येथील पोस्ट कार्यालयात खातेदारांमार्फत जमा विविध योजनांच्या रकमेचा अपहार झाला आहे. हे कळताच खातेदारांनी पोस्ट कार्यालयात धाव घेतली. येथील पोस्ट कर्मचारी सुरेश बांदेकर हे गायब झाल्याने या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली. पोस्ट कार्यालयात झालेल्या या गोंधळामुळे सावंतवाडीतील सहाय्यक डाक अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी गुरूवारी घटनास्थळी धाव घेतली होती. काबाडकष्ट करून पोस्टात जमविलेल्या रकमेचा अपहार झाल्याने खातेदारांनी इंगळे यांच्यासमोर अश्रूंचा बांध रिकामा केला होता. उपस्थित खातेदारांनी आक्रमक होत आपली रक्कम ताबडतोब मिळण्यासाठी इंगळे यांना घेराव घातला. इंगळे यांनी सर्वांची रक्कम पूर्ण परताव्यानिशी देण्याचे अभिवचन दिले होते.
दरम्यान, शुक्रवारी पोस्टातील ठेवीदार, खातेदारांनी कार्यालयात एकच गर्दी केली. कार्यालयात आढावा घेण्यासाठी आलेल्या डाक अधीक्षकांना दुसऱ्या दिवशीही घेराव घातला. शेकडो खातेदारांनी आपली रक्कम ताबडतोब मिळण्यासाठी एकच आग्रह धरला. यावेळी इंगळे यांनी खातेदारांना सबुरीचा सल्ला दिला. तर उपस्थितांनी आमच्या घामाच्या रकमेवर डल्ला मारता मग विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न केला. इंगळे यांनी खातेदारांचे सर्व रक्कम व्याजासहीत परत केली जाईल असे ठामपणे सांगितले, त्यासाठी अगोदर कागदपत्रांची तपासणी करू द्या, अशी विनंती केली. यावर खातेदारही काही काळ शांत झाले. पण कार्यालयाच्या बाहेरची गर्दी कमी झाली नाही. दरम्यान, सायंकाळी ओरोस येथील अधीक्षक भोसले यांनी कोनाळकट्टा कार्यालयाला भेट देऊन माहीती घेतली. याची माहिती मिळताच खातेदारांनी कार्यालयात पुन्हा धाव घेत भोसले यांच्याकडेही आमच्या ठेवींची रक्कम ताबडतोब द्या, अशी मागणी करत त्यांनाही घेराव घातला. (प्रतिनिधी)
अपहार झालेले खातेदार : शुक्रवारी पुन्हा भर पडली
४दरम्यान गुरूवारी झालेल्या अपहार नोंदीतील खातेदारांशिवाय आज पुन्हा यामध्ये भर पडली आहे. यामध्ये आशुमती गवस (४० हजार), प्रतिमा भट (२ लाख), रमेश गवस (९८ हजार), कमल राजाराम जाधव (४५ हजार), सुनिता दिवाकर नाईक वायंगणतड (२ लाख ५० हजार), प्रकाशिनी प्रकाश तावडे (तिराळी) (१६ हजार), आबाराव लोंढे (३ लाख), अनिल गवस (१ लाख), रामकृष्ण मणेरीकर (१ लाख ५० हजार), प्रसाद तिळवे (१६ हजार), गंगाराम पांगम (१ लाख ८७ हजार) यांचा समावेश आहे.