'काजू बी'ला प्रति किलो २०० रूपये हमीभाव द्या, बागायतदार आक्रमक; सावंतवाडीत धरणे आंदोलन
By अनंत खं.जाधव | Published: February 16, 2024 05:43 PM2024-02-16T17:43:42+5:302024-02-16T17:43:55+5:30
सावंतवाडी : काजू बी ला किमान प्रति किलो २०० रुपये हमीभाव देण्यात यावा. डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू ...
सावंतवाडी : काजू बी ला किमान प्रति किलो २०० रुपये हमीभाव देण्यात यावा. डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा. तसेच काजू गरावर २० टक्केहून अधिक आयात शुल्क आकारावे, या मागण्यांसाठी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदारांनी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले आहे.
यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग फळबागायत संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी धरणे आंदोलनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे लखमसावंत भोसले यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठींबा दिला.
सावंत म्हणाले की, काजू हे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या वीस वर्षात मजुरी १० पट, खतांच्या किमती १३ पट वाढल्या. मात्र काजू बीचा दर दुप्पट सुद्धा झाला नाही. त्यामुळे काजू बागायतदार शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे. काजू बी ला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
जिल्हाभरात गावोगावी काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या नियोजन बैठका होत आहेत. त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनात सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादक संघटना, काजू समूह गोपुरी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना आणि शेतकरी संघ दोडामार्ग या संघटना सहभागी झाल्या आहेत. असे ते म्हणाले.
यावेळी सुरेश गावडे, रघुनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, नितीन मावळणकर, प्रवीण देसाई, जगदेव गवस, सुरेश गावडे, सदाशिव गाड, नितीन सावंत, घनश्याम नाईक, बाळा परब, प्रकाश वालावलकर, लक्ष्मण निगुडकर, प्रदीप सावंत, संजय लाड, राजन देसाई, प्रमोद कामत, बाबल ठाकूर, संतोष परब, मंगेश देसाई, शशिकांत सावंत, सुभाष सावंत, पप्पू सावंत, विजय राऊळ, गुरुनाथ गवंडे, सुरेश गवस, गुणाजी गावडे आदी शेतकरी उपस्थित होते.