‘जपून घे झोका गं’तून मुलींना मार्गदर्शन
By admin | Published: August 17, 2016 10:15 PM2016-08-17T22:15:18+5:302016-08-17T23:11:22+5:30
बांदा येथे कार्यक्रम : अस्मिता गु्रपचा पुढाकार, प्रतिसाद अॅपचे दाखविले प्रात्यक्षिक
बांदा : समाजात दैनंदिन जीवनात वावरताना महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिला, मुलींनी समाजात सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणती काळजी घ्यावी व जागरुकता कशी बाळगावी, याबाबत बांदा पोलिस ठाण्याच्या सहकार्याने मार्गदर्शन करण्यात आले. अस्मिता गु्रपच्या महिलांनी ‘जपून घे झोका गं’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बांदा बसस्थानक येथे महाविद्यालयीन मुलींबरोबरच पालक व ग्रामस्थ यांना धडे दिले.
यावेळी पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रदीप गीते व पोलिस कर्मचारी यांनी महिलांवरील अत्याचाराबाबतचे विविध गुन्हे व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कलमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महिला व मुलींच्या मोबाईलमध्ये ‘प्रतिसाद अॅप’ कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक दाखविले.
मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने समाजात जनजागृतीच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संकल्पना प्रदीप गीते यांनी मांडली. त्यासाठी अस्मिता गु्रपच्या महिलांची मदत घेतली. गु्रपच्या प्रमुख रुपाली शिरसाट यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महिला व मुलींनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. नाबर स्कूलच्या शिक्षिका रिना मोरजकर यांनी मुलींनी अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून काय करावे याबाबत मार्गदर्शन केले. लक्ष्मी सावंत, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, अरुणा सावंत यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रदीप गीते म्हणाले, कायद्यात महिलांच्या छेडछाडीबाबत कडक कायदे असतानाही अत्याचारांच्या घटना या वाढत्याच आहेत. महिला किंवा मुलीला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीची घटना घडल्यास ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा. यासाठी पोलिस खात्याने ‘प्र्रतिसाद अॅप’ची निर्मिती केली आहे. यावेळी महिला पोलिस कर्मचारी सारिका बांदेकर, स्मिता डिसोजा यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, माजी सरपंच शितल राऊळ, सनी काणेकर, सुधीर शिरसाट, राजेश गोवेकर, राकेश विर्नोडकर, प्रियांका नाईक, अस्मिता गुु्रपच्या रिमा गोवेकर, मनाली नाईक, सुवर्णलता धारगळकर, प्राची नार्वेकर, श्रेया कोरगावकर, जानकी नाईक, जयश्री कुबडे आदी महिलांसह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)