होमगार्डना हवी सेवेची हमी
By admin | Published: December 5, 2014 09:50 PM2014-12-05T21:50:32+5:302014-12-05T23:17:24+5:30
आज नागरी संरक्षण दिन : पोलिसांसारखीच सेवा मात्र लाभ नाही
मिलिंद पारकर - कणकवली -नागरी संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, आवश्यक त्या वेळी उपलब्ध होणाऱ्या होमगार्डना कोणत्याही वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचारण केले जाते. मात्र, पोलिसांसारखेच प्रशिक्षण घेऊन त्यांच्यासारखीच सेवा बजावणाऱ्या होमगार्डना इतर वेळी कोणताही लाभ मिळत नाही.
पोलीस विभागात सध्या रिक्त पदांनी ताण येत आहे. बंद, संप, मोर्चा आणि इतर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगात होमगार्डना पाचारण केले जाते. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा ताण काही प्रमाणात कमी होतो. हव्या त्या वेळी उपलब्ध होणाऱ्या होमगार्डना मात्र पोलिसांसारख्या सुविधा मिळत नाहीत. त्यांना दैनंदिन भत्त्यावर फक्त अवलंबून रहावे लागत आहे. स्वयंसेवकासारखी ही सेवा असली तरी होमगार्डना शासनाकडून काही बाबतीत हमी हवी आहे.
जिल्ह्यातील होमगार्ड प्रथमोपचार, अग्निशमन, शस्त्रप्रशिक्षणासह सज्ज आहेत. होमगार्ड होण्यासाठी १६ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर, त्यानंतर घाटकोपर येथे पुढील प्रशिक्षण दिले जाते. तीन वर्षांचे प्रशिक्षण घेऊन होमगार्ड नागरी संरक्षणासाठी आवश्यक त्या वेळी हजर होतात. मात्र, इतर वेळी त्यांना आर्थिक वा इतर लाभ मिळत नाहीत.
जिल्ह्यात एकंदर पोलीस बळ गरजेपेक्षा कमी आहे. तालुक्याच्या ठिकाणची पोलीस स्थानके आणि दूरक्षेत्रे अशा ठिकाणी होमगार्डना महिन्यातून किमान पंधरा दिवस सेवा मिळावी, अशी होमगार्डची अपेक्षा आहे.
होमगार्डना एप्रिलपासून दिवशी ४०० रूपये भत्ता सुरू करण्यात आला आहे. त्यापूर्वी हा भत्ता १७५ रूपये इतका होता. त्यामध्ये २५ रूपये आहारभत्ता आणि १५० रूपये सेवा भत्त्याचा समावेश होता.
मात्र, आताही प्रवासासाठी वॉरंट किंवा प्रवास भत्ता मिळत नाही. त्यामुळे घरापासून लांब जाताना प्रवास खर्च भत्त्यामधूनच करावा लागतो. अशा अनेक समस्यांनी होमगार्ड त्रस्त आहेत. त्यामुळे होमगार्ड समाधान मिळत
नाही.
फायदे मिळणे गरजेचे
सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या होमगार्डना सेवेच्या दिवशी मिळणाऱ्या भत्त्याव्यतिरीक्त कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. आवश्यक त्या वेळी सेवेसाठी हजर होणाऱ्या होमगार्डना महिन्यातून किमान पंधरा दिवस काम मिळावे. सेवेतून निवृत्त होताना होमगार्डना काही फायदे मिळणे गरजेचे आहे.
- व्ही. जी. पावसकर,
कणकवली तालुका प्रभारी समादेशक
मागण्या अनेक, ठोस कार्यवाही नाही
जिल्ह्यात सध्या ४०० होमगार्ड आहेत. त्यापैकी ३०० पुरूष तर १०० महिला सदस्य आहेत. काही होमगार्डस् तर २० वर्षांहून अधिक काळ सेवेत आहेत.
स्वयंसेवी काम असले तरी होमगार्ड सेवेकडे युवकांनी वळावे यासाठी शासनाने काही सुविधा देण्याची अपेक्षा असते.
शासनाकडे होमगार्ड संघटनेकडून मागण्याही करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप त्याच्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही.