देवगडात पालकमंत्र्यांचा काँग्रेसकडून निषेध
By admin | Published: October 24, 2015 11:31 PM2015-10-24T23:31:47+5:302015-10-24T23:31:47+5:30
मंत्रालय बैठक : स्थानिक आमदारांना बोलावले नसल्याने नाराजी
देवगड : देवगडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात बैठक लावली. मात्र, ती केवळ दिखावा असून स्थानिक आमदारांना या बैठकीला बोलावले नाही. या कृतीचा देवगड तालुका काँग्रेसने निषेध नोंदविला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देवगडचा पाणीप्रश्न ज्वलंत आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यात लक्ष घालून तो सोडविण्याची गरज होती. मात्र, तो प्रलंबित ठेवला. शासनस्तरावर या प्रश्नासाठी केवळ श्रेय घेण्यासाठी स्थानिक आमदार नीतेश राणे यांना बोलावले जात नाही. वास्तविक, पाणीप्रश्नात राजकारण आणू नका, पाणीप्रश्न हा जनतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे वारंवार आमदार नीतेश राणे म्हणाले आहेत. असे असताना पालकमंत्री दीपक केसरकर हे यामध्ये श्रेयवादाचे राजकारण आणत आहेत.
मुळातच पालकमंत्री केसरकर व प्रमोद जठार यांना पाणीप्रश्न कळलेलाच नाही. पालकमंत्री केसरकर हे तिलारीहून पाणी आणण्याची योजना आखत आहेत, तर प्रमोद जठार नाधवड्याच्या धरणावरून पाणी आणू, असे सांगत होते. आता शासन आल्यावर याबाबत काहीच बोलत नाहीत. कोणत्याही उपायाने पाणी आणा अशी देवगडच्या जनतेची भूमिका आहे. यासाठी आमदार नीतेश राणे यांनी तातडीने या गावांसाठी पाणी योजना करा, अथवा पाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी पैसे द्या, अशी भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका योग्य आहे.
काँग्रेसचे आंदोलन श्रेयवादासाठी नाही, तर पाणी मिळावे यासाठी आहे. ज्या ज्या पातळीवर आंदोलन केले पाहिजे ते करून पाणी मिळेपर्यंत सरकारला धारेवर धरण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबाबत आता आमदार नीतेश राणे यांनी रणशिंग फुंकले असून ६ नोव्हेंबरला ‘आर या पार’ची लढाई काँग्रेस लढणार
आहे. (प्रतिनिधी)