पालकमंत्री निष्क्रिय ठरले

By Admin | Published: April 8, 2016 09:12 PM2016-04-08T21:12:07+5:302016-04-08T23:56:32+5:30

परशुराम उपरकर यांचा आरोप : सत्ताधाऱ्यांचेच अधिकारी ऐकत नसल्याची खंत

Guardian minister became inactive | पालकमंत्री निष्क्रिय ठरले

पालकमंत्री निष्क्रिय ठरले

googlenewsNext

मालवण : काँग्रेसला धुडकावून लावत केंद्रात आणि राज्यात युतीचे शासन आहे. कोकणा-तील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, तेच सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत आहेत. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवताना आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सत्ताधाऱ्यांत रंगले आहे. आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी अधिकारी करत नाही, असे विधानसभेत सांगण्याची वेळ सत्ताधारी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर येते याचाच अर्थ त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री निष्क्रिय बनले आहेत, असा आरोप करत, माजी आमदार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शिवसेनेवर प्रहार केला.
दरम्यान, मालवण आनंदव्हाळ-कसाल या मुख्य रस्त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या डांबरीकरण कामात वापरण्यात आलेल्या साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी केली. या तपासणीत २७ टक्के डांबर प्रमाण कमी असण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे सर्वच रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून, जनतेच्या पैशांचा डल्ला मारण्याचे काम हे सरकार व ठेकेदार मंडळी करत आहेत असे सांगत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचे उपरकर यांनी मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष गणेश वाईरकर, शैलेश अंधारी, भिवा शिरोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, मालवण आनंदव्हाळ-कसाल या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याच्या कामात वापरलेल्या साहित्याचे नमुने घेत ते मनसेच्यावतीने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या साहित्याच्या तपासणीत प्रत्यक्षात ३.५ एवढ्या प्रमाणात डांबराचा वापर करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात २.५६ एवढेच डांबर म्हणजे सुमारे २७ टक्के डांबर कमी वापरण्यात आले असल्याचे दिसून आले.
पाटबंधाऱ्यांच्या कामांना निधी नाही, वन संज्ञाप्रश्न ते सोडवू शकले नाहीत. विरोधी पक्षांना जे प्रश्न मांडायला हवेत, तेच प्रश्न मांडण्याची वेळ सत्तेतील आमदारांवर आली. आरोग्याचा प्रश्न अधांतरीच राहिला असून, जिल्ह्यातील आंबा नुकसान भरपाईचीही दाखल या अधिवेशनात घेण्यात आली नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री कोटीच्या विकासाच्या घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात त्या योजना अधिकारी वर्गाला माहीतच नसतात. त्यामुळे जनतेची फसवणूक केली जात आहे. (प्रतिनिधी)

कोकणातील जनतेचा भ्रमनिरास
काँग्रेसने जिल्ह्याचे वाटोळे केले. त्यानंतर सत्तेत एकत्र आलेले शिवसेना-भाजप एकमेकांच्या विरोधात शत-प्रतिशत सांगत असून, दुसरीकडे जनतेचा भ्रमनिरास करत आहेत. काँग्रेसला धुडकावून कोकणातील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, त्यांनीच कोकणातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्याचे काम केले आहे, असा आरोपही उपरकर यांनी केला आहे.

Web Title: Guardian minister became inactive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.