Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक

By सुधीर राणे | Published: August 16, 2024 04:48 PM2024-08-16T16:48:43+5:302024-08-16T16:51:42+5:30

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील

Guardian Minister Ravindra Chavan should announce how many problems of common people have been solved says MLA Vaibhav Naik | Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक

Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक

कणकवली: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झालेल्या जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान उद्धवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे सुरू आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

कणकवली विजय भवन येथे आज, शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, जनता दरबारातून सर्वसामान्यांचे किती प्रश्न मार्गी लागले हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अन्यथा जनता दरबार हा केवळ निवडणुकीचा फार्स होता हे स्पष्ट होईल.

गेल्यावर्षी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ५ कोटींचा खर्च करण्यात आला. परंतु त्यातून सुध्दा प्रश्न सुटले नाहीत. हे वर्षभराने सत्ताधा-यांना समजले आहे. त्यामुळे तो खर्च फुकट गेला आहे. आता जनता दरबारवर जो खर्च झाला किंवा अधिकारी चार दिवस तिथे होते. त्यामाध्यमातून किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला? हे स्पष्ट करावे. 

..कोणत्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल 

पालकमंत्री चव्हाण हे प्रत्येक गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होणार असल्याचे जाहीर करतात. प्रत्यक्षात चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होत नाही. त्यामुळे कुठल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी चौपदरीकरण पूर्ण होईल हे देखील पालकमंत्र्यांनी जाहीर करायला हवे.

जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांच्याच 

कुडाळ विधानसभा मतदारसंघातून जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी आल्याचे भाजपचे काही स्वयंघोषित पुढारी सांगत आहेत. परंतु त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री अडीच वर्षे कार्यरत आहेत. त्याच्या आधी पालकमंत्री असलेले आता महायुतीत आहेत. त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री पण होते. एवढे सत्ताधारी मंत्री असून सुध्दा प्रश्न का सुटले नाहीत ? याचा जाब सत्ताधा-यांना विचारावा. त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. जनता दरबारातील सर्वाधिक तक्रारी या भाजप कार्यकर्त्यांच्याच होत्या. भाजप कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी ऐकत नाहीत. त्यांची कामे करत नाहीत अशा तक्रारी नोंदविण्यात आल्या. जर जिल्हा प्रशासन भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असेल तर सामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडविणार? 

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील

पालकमंत्र्यांनी एका भाषणात सांगितले होते की , जनता आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. ही दरी निर्माण करण्यामध्ये ते स्वतः काहीअंशी कारणीभूत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक, पदवीधर निवडणूक, लोकसभा निवडणूक , ग्रामपंचायत निवडणूक यांमध्ये पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिलेली नाही. कणकवलीचे आमदार जाहिरपणे सांगतात की, निवडणूक आल्या की भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदार शोधत येतील. असा उन्मतपणा वाढल्यामुळेच कार्यकर्ते आणि जनतेतील दरी वाढलेली आहे. परंतु, मला निश्चित खात्री आहे की , सिंधुदुर्ग हा वेगळा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये यापुर्वी ज्या काही  गोष्टी झाल्या आहेत. त्यातून लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील असेही वैभव नाईक म्हणाले.

Web Title: Guardian Minister Ravindra Chavan should announce how many problems of common people have been solved says MLA Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.