सिंधुदुर्ग : पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार ; परशुराम उपरकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 05:32 PM2018-11-10T17:32:00+5:302018-11-10T17:35:07+5:30
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. पालकमंत्र्यांच्या सावंतवाडीतच अफू-गांजा तसेच जुगार जोरात असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.
सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. पालकमंत्र्यांच्या सावंतवाडीतच अफू-गांजा तसेच जुगार जोरात असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, अमित इब्रामपूरकर, सुधीर राऊळ, राजू कासकर, अनिल केसरकर, ललिता नाईक, कृष्णा गावडे, ओंकार कुडतरकर ,गीता पाटेकर, संकेत मयेकर, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, जिल्ह्यात गेले काही दिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी येथील नरेंद्र्र डोंगरावर तेथील कुंड्या व बेंच मोडतोड करण्याचा प्रकार झाला होता. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी परिसरात बसल्या जाणाऱ्या परप्रांतीयांकडून झाला. याची अधिकृत माहिती व पुरावे आपल्याकडे आहेत.
नरेंद्र डोंगर परिसरात असलेल्या उद्यानात गांजा-अफू आदी अंमली पदार्थांचा मोठा वापर केला जातो. त्या ठिकाणी मटका जुगार खेळला जातो. त्यातून परप्रांतीयांकडून हा प्रकार झाल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकाराची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी आम्ही मनसेकडून करणार आहोत.
उपरकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात केवळ घोषणाबाजी करण्याचे काम पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर करत आहेत. राज्यमंत्री असून सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध धंदे, दारू वाहतूक, अंमली पदार्थ, जुगार मटका आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात केसरकर अपयशी ठरले आहेत.
राणे यांच्या काळात मनसेने त्यांच्या विरोधात पालकमंत्री हटाव असे आंदोलन केले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती मनसे करणार आहे. केसरकर यांच्या विरोधात पालकमंत्री हटाव आंदोलन केले जाणार आहे. लवकरच याची घोषणा होईल, असे उपरकर यांनी सांगितले.