पालकमंत्र्यांनी वाळू, दगड उत्खनन पुन्हा सुरू करून दाखवावे

By admin | Published: May 14, 2015 10:27 PM2015-05-14T22:27:23+5:302015-05-14T23:58:08+5:30

प्रसाद मोरजकर : मालवण पंचायत समिती सभेत सदस्याने दिले शिवसेनेला आव्हान

Guardian Minister should resume sand, stone excavation | पालकमंत्र्यांनी वाळू, दगड उत्खनन पुन्हा सुरू करून दाखवावे

पालकमंत्र्यांनी वाळू, दगड उत्खनन पुन्हा सुरू करून दाखवावे

Next

मालवण : युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात प्रशासनाकडून वाळू व्यावसायिकांवर नाहक कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे पालकमंत्री असताना जिल्ह्यात वाळू आणि काळ्या दगडाचे उत्खनन सुरळीत होत होते. वाळू-दगड व्यावसायिकांवर होणारा अन्याय दूर होणे आवश्यक असून, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात धमक असल्यास त्यांनी पूर्वीप्रमाणे वाळू व काळा दगड उत्खनन सुरु करून दाखवावे, असे आव्हान पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी पंचायत समिती मासिक सभेत बोलताना दिले.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य प्रसाद मोरजकर, संजय ठाकूर, उदय दुखंडे, राजेंद्र प्रभुदेसाई, श्रद्धा केळुसकर, सुजला तांबे, हिमाली अमरे व अधिकारीवर्ग उपस्थित होता.
यावेळी प्रसाद मोरजकर म्हणाले, जिल्ह्यातील वाळू प्रश्न पेटलेला असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. केसरकर पालकमंत्री झाल्यापासून प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणारे डंपर पकडणे, होड्या सील करणे तसेच वाळू व्यावसायिकांकडून ६० हजार रुपयांपर्यंत अवाजवी दंड आकारणे असे प्रकार सुरु झाले. नारायण राणे पालकमंत्री असताना वाळू व्यावसायिकांवर असा अन्याय होत नव्हता, असेही मोरजकर म्हणाले.
यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी गोवा येथील पर्ससीन मच्छिमार व मालवणातील पारंपरिक मच्छिमार यांच्यातील वादावर सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे असल्याचे सांगत यासाठी गोवा व महाराष्ट्र सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी, असे सांगितले. तसेच दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात झाडे पडून वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण कंपनीने कोणती उपाययोजना केली आहे, असा सवाल वीज अभियंत्यांना चिंदरकर यांनी केला. यावर वीज वाहिन्यांवर आलेली झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे असे वीज अभियंत्यांनी सांगितले. यावेळी संजय ठाकूर यांनी वीज वाहिन्यांवरील झाडे तोडण्यासाठी वीज कर्मचारी पैसे मागतात, असा आरोप केला. हा आरोप चुकीचा असल्याचे वीज अभियंत्यांनी सांगून अशा प्रकारे कोण पैसे मागत असतील तर त्यांची नावे द्यावीत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पी. ए. बोटलवार यांचा सत्कार
महावितरणचे आचरा उपविभाग अभियंता पी. ए. बोटलवार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पंचायत समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर व सभापती सीमा परुळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बोटलवार यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title: Guardian Minister should resume sand, stone excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.