हत्तींना पकडणाऱ्या टीमचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
By admin | Published: February 13, 2015 01:11 AM2015-02-13T01:11:08+5:302015-02-13T01:13:59+5:30
ही मोहीम राबविण्यासाठी पैशापेक्षा विविध पातळीवर परवानग्या लागतात. त्याचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत यांनी केला व त्यास कर्नाटक राज्यानेही सहकार्य केले.
माणगाव : डॉ. उमाशंकर यांच्या टीमने दोन रानटी हत्तींना जेरबंद करून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व माणगाव खोऱ्यात वास्तव्यास असलेला तिसरा हत्ती पकडण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी आंबेरी येथे भेट दिली. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, तिन्ही हत्तींना पकडून आंबेरी येथेच त्यांना कर्नाटकातील तज्ज्ञ मंडळींकडून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळ्या पॅकेजची तरतूद मी करणार असून, या तिन्ही हत्तींचा वापर पर्यटनासाठी करण्यात येईल. दोडामार्ग परिसरात वावरणाऱ्या चार हत्तींचा अधिवास कायम ठेवण्यासाठी पूरक अशा उपाययोजना करण्यात येतील. जेणेकरून ते चारही हत्ती मानवी वस्तीत येणार नाही. मात्र, त्याचा पर्यटनासाठी उपयोग होईल. ही मोहीम राबविण्यासाठी पैशापेक्षा विविध पातळीवर परवानग्या लागतात. त्याचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत यांनी केला व त्यास कर्नाटक राज्यानेही सहकार्य केले. तसेच मोहिमेस पूरक अशी कामगिरी महाराष्ट्र वनविभागानेही केल्याने या सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले. तसेच या मोहिमेचे प्रमुख डॉ. उमाशंकर व दोन्ही हत्तींना डॉट मारणारे व्यंकटेश तसेच करिमभैय्या व रमेश यांचा सत्कार पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. माणगाव जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर, योगेश धुरी, सुभाष भिसे, पंचायत समिती सदस्य संतोष कुंभार यांच्यासह मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम आदी वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हत्तींचा वापर जंगल सफरीसाठी करणार
या तीनही हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी खास कर्नाटकातील पथकाला बोलावून हत्तींना प्रशिक्षित करून जंगल सफरीसारखे पर्यटन सिंधुुदुर्गात सुरू होण्याच्या दृष्टीनेही आपला प्रयत्न असेल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.