२३ गावांवर रक्षकांची नजर
By admin | Published: November 20, 2015 11:11 PM2015-11-20T23:11:42+5:302015-11-21T00:19:32+5:30
किनारा सुरक्षा : नाटे पोलीस ठाण्यांतर्गतची चार गावे अतिसंवेदनशील
राजापूर : राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार अतिसंवेदनशील गावात सुरक्षारक्षक तैनात केले जाणार असून, मत्स्य विभागाकडून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २३ अतिसंवेदनशील केंद्रांवर अशा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत आंबोळगड, मुसाकाझी, माडबन व नाटे या गावांचा त्यात समावेश आहे. मागील काही वर्षात घडलेल्या दहशतवादी कारवाया लक्षात घेता स्फोटके समुद्रमार्गे कोकणच्या किनारपट्टीवर उतरवण्यात आली होती, हे नंतर तपासात सिद्ध झाले. त्यादृष्टीने कोकणची किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानली जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सागरी किनारपट्टीवर पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. म्यानमारमधील विस्थापित रोहिंगे मुस्लिम समुद्रमार्गे जैतापूर येथे काही दिवसांपूर्वीच आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी कुणी असा प्रवेश करू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेणे क्रमप्राप्त असून, रत्नागिरी जिल्ह्यात अशी २३ गावे अतिसंवेदनशील म्हणून ओळखली जात आहेत.अतिसंवेदनशील गावात सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ही नियुक्ती मत्स्य विभागाकडून होणार असून, तसे पत्र नाटे पोलिसांना प्राप्त झाल्याची माहिती पोलीस ठाण्याच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. यासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला सुमारे ४० किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली असून, लगतच्या २५ ते ३० गावांचा त्यात समावेश होतो. या परिसरात साखरीनाटे, मुसाकाझी, आंबोळगड अशी पुरातन बंदरे आहेत. दरदिवशी लाखो रुपयांचा मत्स्य व्यवसाय होतो. यातील बहुतांश कुटुंब याच व्यवसायावर अनेक वर्षांपासून आपली उपजीविका करीत आहेत. त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये, यादृष्टीने सतर्कता बाळगली जाणार आहे. त्यातूनच गावात सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील चार गावांचा त्यामध्ये समावेश आहे. या चार गावांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
सतर्कता : सागरी सुरक्षेसाठी कडक धोरणाची अंमलबजावणी
मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर कोकणाला लाभलेल्या सागरी सुरक्षेकडे बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. त्यावेळी समुद्रमार्गेच दहशतवादी मुंबईत घुसल्याने किनाऱ्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
रोहिंगेनंतर जाग
काही दिवसांपूर्वी राजापूर तालुक्याच्या जैतापूर परिसरात म्यानमार येथील रोहिंगे मुस्लिमांना ताब्यात घेण्यात आले होते. समुद्रमार्गे आलेल्या रोहिंग्यांना पकडल्यानंतर सागरी सुरक्षेबाबत पुन्हा जाग आली आहे. त्यादृष्टीने यंत्रणा सतर्क झाली आहे.