कुडाळ येथे गुरुवारपासून ग्रंथोत्सव
By admin | Published: February 22, 2015 10:36 PM2015-02-22T22:36:42+5:302015-02-23T00:21:51+5:30
तीन दिवस कार्यक्रम : जिल्हा माहिती कार्यालयाचा पुढाकार, वाचनावर परिसंवाद
ओरोस : मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय व शासकीय ग्रंथालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने कुडाळ येथे गुरुवार (दि. २६) ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ‘ग्रंथोत्सव २०१५’चे आयोजन केले असून, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे यांनी केले आहे.शासनाच्या मराठी भाषा विभाग व माहिती जनसंपर्क महासंचालय यांच्या विद्यमाने कुडाळ येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे गुरुवारी दुपारी ३ वाजता ग्रंथोत्सव समारंभाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते, तर आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कुडाळ सरपंच स्नेहल पडते, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांच्या उपस्थितीत होणार आहे.सायंकाळी ५ ते ६ या वेळेत स्वरब्रह्म, मालवण निर्मित सुगम संगीत गझल कार्यक्रम, तर तिसऱ्या सत्रात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मुग्धा सौदागर गीतरामायण सादर करणार आहेत. २७ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. खुल्या गटासाठी ‘मला वाचनाने काय दिले, मला आवडलेले पुस्तक, युवक वाचतील तर देश वाचेल’ असे विषय आहेत. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २५००, २०००, १५०० रुपये अशी पारितोषिके आहेत. दुपारी ३ ते ५ या कालावधीत प्रा. वि. स. बापट यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. प्रमुख अतिथी आनंद वैद्य, बाळा कदम, मधुसूदन नानिवडेकर, दादा मडकईकर, आ. सो. शेवरे, सुनंदा कांबळे, रुजारिओ पिंटो, मधुरा आठल्येकर, तरुजा भोसले असणार आहेत. सूत्रसंचालन नीलेश जोशी करतील. सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत ओंकार साधना मुंबईनिर्मित ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ एकपात्री काव्यानुभव सादर होणार आहे.२८ फेब्रुवारीला सकाळी १० ते १ या वेळेत ‘वाचक घडवावा लागतो’ या विषयावर परिसंवाद होईल. प्रा. शेख अर्शद साजुद्दीन आवटे, गजानन वालावलकर, शरयू आसोलकर, महेश काणेकर, गजानन प्रभू, रवींद्रनाथ कांबळी, रमाकांत खानोलकर सहभागी होतील. दुपारी ३ नंतर पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रम होईल. यावेळी कुडाळ पं. समिती सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती रामचंद्र सावंत, सरपंच स्नेहल पडते, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता भूषण गोसावी यांचा स्वरांजली हा भक्तिगीत, भावगीत गायनाचा कार्यक्रम होईल. (वार्ताहर)
महोत्सवात ग्रंथस्टॉल
या ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथस्टॉल उभारण्यात येणार आहेत. या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख वक्ते व साहित्यिक मदन हजेरी यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या सत्रातील सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ‘शब्द झाले सप्तरंगी’ या गझल कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, गझलकार मधुसूदन नानिवडेकर उपस्थित राहणार आहेत.