अतिथी देवाच्या स्वागतासाठी!-

By admin | Published: November 13, 2015 08:59 PM2015-11-13T20:59:13+5:302015-11-13T23:42:37+5:30

- कोकण किनारा

Guest to welcome God! | अतिथी देवाच्या स्वागतासाठी!-

अतिथी देवाच्या स्वागतासाठी!-

Next



सुट्ट्यांचा हंगाम सुरू झालाय. सर्वसाधारणपणे दिवाळीचे दिवस संपल्यानंतर हळूहळू सुट्ट्या सुरू होतात. नाताळचा काळ तर पर्यटकांचा सर्वाधिक पसंतीचा काळ. कोकणही या काळात काहीसा गारठलेला असतो. गेली काही वर्षे गोव्यात पर्यटकांची ओव्हरपॅक गर्दी होत असल्याने तेथे जाण्याऐवजी कोकणात मुक्काम करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या कोकणात घालवणारे लोक वाढत आहेत. पण या अतिथींचे स्वागत करण्यासाठी आपण पुरेसे तयार आहोत का? ही तयारी दळणवळणाच्या सुविधांची हवी, आलेल्या पर्यटकांना सुरक्षितता देऊन सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्याची हवी. कोकणाला निसर्गाने सौंदर्याचं वरदान दिलं असलं तरी औदार्याबाबत कोकणाला नावे ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. आलेल्या पाहुण्यांना आपुलकी दाखवण्याची आपली अजूनही तयारी नाही. सर्वांनी मिळून काहीतरी नवं करण्याची आपली तयारी नाही. ही तयारी झाली तर कोकणाकडे वळणाऱ्या पावलांची संख्या अधिक होईल.
पावसाळा संपला असला तरी कोकणातील हिरवाई या काळात चांगली टिकून असते. समुद्रकिनारी असलेली गावे वगळली तर थंडीचे प्रमाणही खूप चांगले असते. पहाटे धुक्याची चादर ओढलेले डोंगर, घाटातले रस्ते, पक्ष्यांची किलबिल, चरायला म्हणून बाहेर पडलेल्या गायी-म्हशींच्या गळ्यातल्या घुंगरांचे आवाज, अशी पहाट ग्रामीण भागात आजही अनुभवायला मिळते. समुद्रकिनाऱ्यांचा थाट काही औरच. नीरव वातावरण छेदणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत राहणं हा वेगळाचा आनंद आहे.
आताशा वाऱ्यांचे तानमान पाहून मासेमारीही जोमात सुरू झाली आहे. कोकणात आलेल्या पाहुण्यांसाठी सुरमई, बांगडा, पापलेटबरोबर कोळंबीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासारख्या खूप गोष्टी कोकणात उपलब्ध असतात. आता गरज आहे ती काही आपल्यातील बदलांची. मुळात चौपदरीकरणाचे काम वेळेत, वेगात व्हावे, यासाठी व्यावसायिक आणि नागरिकांचा मोठा रेटा अपेक्षित आहे. प्रवासाचा कालावधी कमी होवो किंवा न होवो, पण प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी चौपदरीकरण अत्यंत गरजेचे आहे. अलिकडच्या काळात घरगुती कार्सची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे लोक फिरायला बाहेर पडताना सोयीसाठी म्हणून स्वत:च्या किंवा भाड्याच्या गाडीने प्रवास करतात. हा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी चौपदरीकरण हा महत्त्वाचा भाग आहे. कुठलाही प्रवासी गाडीतून खाली उतरतानाच ‘नको रे बाबा असा प्रवास’ असे म्हणाला की, तो परत कोकणात येणार नाही, याची चाहुल लागते.
चौपदरीकरण टप्प्याटप्प्याने होईलच. पण, त्याच्याइतकेच महत्त्व द्यावे लागणार आहे ते आपल्या वागणुकीला. त्यात सर्वात मोठा पुढाकार घ्यावा लागेल तो हॉटेल व्यावसायिकांना. गोव्याप्रमाणेच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आपल्या हॉटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांशी सातत्याने संवाद साधला जातो. त्यांचे नियोजन कसे आहे, त्यांना बघता येईल, असे आसपास काय आहे, कोणत्या ठिकाणी त्यांनी जास्तवेळ थांबणे अधिक गरजेचे आहे, यासह त्यांच्या गरजा, वाहनांची, इंधनाची उपलब्धता याबाबतही पाहुण्यांशी अधिकाधिक संवाद होणे गरजेचे आहे.
कुठल्याही प्रदेशात पर्यटनासाठी म्हणून जाणाऱ्या लोकांना तेथील स्थानिक भोजन, कला यामध्ये विशेष रस असतो. यादृष्टीने भोजन देण्याची तयारी हवी. एका गावातील चार-पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक असतील तर त्यांनी एकत्र येऊन कोकणी खेळे, भारूड, जाखडी यांसारखे कार्यक्रम करण्याची तयारी ठेवायला हवी. असे कार्यक्रम पर्यटकांना कोकणात परत परत येण्यास उद्युक्त करतात. पर्यटक येतात, त्या काळात आपल्या गावात कोणकोणते कार्यक्रम होत आहेत, याची माहिती सकाळच्या सत्रातच देण्याची पद्धत गोव्यात विशेषत्त्वाने पाळली जाते. हॉटेलकडूनच अनेक कार्यक्रम केले जातात. तसा व्यावसायिकपणा अजून रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये दिसत नाही.
केवळ गोवा नाही; तर सिंधुदुर्गातही अनेक ठिकाणी पर्यटनावरच आपला चरितार्थ चालणार असल्याची जाणीव झालेल्या लोकांनी आपल्या गावात, आपल्या वागण्यात खूप बदल केले आहेत. मालवणमधील तारकर्ली गावात अनेक घरांमध्ये निवास न्याहरी योजना राबवली जाते. घरगुती पद्धतीचं राहणीमान आणि घरगुती जेवण ही तिथली खासीयत आहे. सुनामीमुळे तयार झालेल्या वाळूच्या बेटावर वॉटर स्पोर्टस्च्या माध्यमातून पर्यटकांना वारंवार आपल्याकडे खेचून घेण्याची मानसिकता तिथल्या लोकांमध्ये तयार झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात निवास न्याहरी योजना राबवणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. गणपतीपुळे, गुहागर, दापोली यांसारख्या ठिकाणी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. राजापूर तालुक्यातही वेत्ये, आंबोळगड यांसारखे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरू शकतात. पण हे किनारे लोकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत. व्यावसायिकपणे त्यावर काम होणे गरजेचे आहे. पर्यटन हा कोकणाचा विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा मोठा आधार बनू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात लोकांना त्याची जाणीव झाली आहे आणि तसे बदलही झाले आहेत. पण रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही असे बदल होणे आवश्यक आहे. गणपतीपुळे, गुहागरमध्ये जाखडी, नमन दाखवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पर्यटकांची संख्या वाढेल त्या काळात ही स्थानिक कला सादर केली गेली, तर त्या कलाकारांनाही मानधन मिळेल आणि पर्यटकांसाठी एक उपक्रम कायमस्वरूपी तयार होऊन जाईल, हे नक्की.
कुठठलाही उपक्रम एकट्याने करण्यापेक्षा तो एकत्र येऊन केला तर त्याला मोठे यश मिळते. सहकारी तत्त्वावर असे प्रयोग केले गेले तर त्याला निश्चितच यश येईल. अतिथी देवो भव ही संकल्पना केवळ पुस्तकात न राहता, प्रत्यक्ष आचारणात आली तर कोकणाला विकासासाठी अन्य कुठल्याच गोष्टीचा आधार लागणार नाही.

मनोज मुळ््ये...

Web Title: Guest to welcome God!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.