विजयदुर्गच्या समुद्रात ‘गुलदार’चे संग्रहालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:29 IST2025-02-26T06:28:49+5:302025-02-26T06:29:08+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी गुलदार ही निवृत्त युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडे मागितली होती.

विजयदुर्गच्या समुद्रात ‘गुलदार’चे संग्रहालय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’चा ताबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आला असून, आता ही युद्धनौका विजयदुर्गच्या खाडीत समुद्राच्या तळाशी ठेवली जाणार आहे. समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या ही युद्धनौका स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार असून, कोकणातील पर्यटकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी गुलदार ही निवृत्त युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडे मागितली होती. कारवारमधील नौदलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमात नौदलाने ही युद्धनौका महामंडळाच्या ताब्यात दिली.
नजीकच्या काळामध्ये पर्यटन महामंडळाच्यावतीने चार पाणबुड्या विकत घेण्यात येणार असून, त्या पाणबुडीतून समुद्रतळ आणि युद्धनौकाही दिसेल अशी योजना असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.
पर्यटकांना होईल दर्शन
‘आयएनएस गुलदार’ लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल. तळाशी स्थिरावल्यानंतर ती स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना ती पाहता येईल.
विजयदुर्ग परिसरात
हा प्रकल्प का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारला होता. या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गच्या बाजूस असलेली वाघोटण खाडी निश्चित करण्यात आली होती.
ही खाडी सुमारे ४२ किलोमीटर लांब आणि ४० ते ५० मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळ-वाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षित मानली जाते.