मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

By अनंत खं.जाधव | Published: February 5, 2024 05:31 PM2024-02-05T17:31:39+5:302024-02-05T17:32:37+5:30

'भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही'

Had I given the boxes I would have become a minister again, Minister Deepak Kesarkar alleges Uddhav Thackeray | मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

सावंतवाडी : भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही. ते कृतघ्न आहेत. मी शिवसेनेत स्वतःहून गेलो नाही, त्यांनी  मला आमदार केले नाही, त्यामुळे त्यांनी खोटे बोलू नये. खोके दिले असते तर पुन्हा मला मंत्री केले असते, असा आरोप राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

सावंतवाडी येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सोमवारी मुंबईतून प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माझा कधीही वैयक्तीक संघर्ष नव्हता. राणेंच्या मागे जिल्हावासियांचे प्रेम आहे. दहशतवाद केव्हाच नव्हता असेही केसरकर म्हणाले.

केसरकर म्हणाले, ठाकरे यांच्या बाबत आदर आहे. म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलत नव्हतो. परंतु काल त्यांनी सावंतवाडीत येवून टीका केल्यामुळे मला विरोधात बोलावे लागत आहे. मी साईभक्त आहे. साईंच्या दर्शनाला जातो आणि खुर्चीची उब मिळविण्यासाठी मी सत्तेत गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे. 

मला आमदार केले असे म्हणणार्‍या ठाकरेंकडे मी कधीही पक्षात घ्या असे सांगण्यासाठी गेलो नाही. भाजपाची आणि विशेषतः मोदींची ऑफर असताना मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी मला निवडून आणले नाही. त्यापुर्वी सुध्दा मी आमदार होतो आणि त्यानंतर सुध्दा मी केवळ सावंतवाडीकरांमुळे आमदार झालो. उलट वैभव नाईकांसह खासदार विनायक राऊत यांना निवडून आणण्यासाठी माझी भूमिका महत्वाची होती. असे ही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्यावर खोके घेतल्याचा आरोप करण्यापेक्षा माझ्या पाच पिढ्याची श्रीमंती आहे, हे विसरु नये. मात्र मी खोके आणून देण्यास नकार दिल्यामुळे मला मंत्रीपद नाकारण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. ठाकरे यांनी कोकणात येवून माझ्यासह राणेंवर आरोप करण्यापेक्षा आपण आज पर्यंत कोकणाला काय दिले? किती जणांना रोजगार दिला? याचे उत्तर द्यावे. 

राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर जिल्ह्यात आलेल्या ठाकरेंच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी कोण धावत नव्हता ही वस्तुस्थिती होती. त्यात राणेंच्या मागे असलेले जिल्हावासीयांचे प्रेम आणि दरारा होता. त्यामुळे किती खोटे बोलावे याचा अभ्यास करावा, असेही मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.

Web Title: Had I given the boxes I would have become a minister again, Minister Deepak Kesarkar alleges Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.