कोकणात गारपीटीचा इशारा

By admin | Published: March 11, 2015 11:21 PM2015-03-11T23:21:29+5:302015-03-12T00:02:37+5:30

बागायतदार हवालदिल : हवामान खात्याने दिला सावधगिरीच्या सूचना

Hail alert in Konkan | कोकणात गारपीटीचा इशारा

कोकणात गारपीटीचा इशारा

Next

रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर परिसराला मंगळवारी सकाळी गारपीटीच्या पावसाने झोडपल्यानंतर हवामान खात्याने संपूर्ण कोकण परिसराला १६ मार्चपर्यंत गारपीटीसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वीच्या पावसातून सावरलेल्या आंबा व काजू बागायतदारांसमोर पुन्हा एक नवे संकट उभे राहिले आहे.काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार आगमन केले होते. त्यानंतर शिमगोत्सवात पावसाने विश्रांती घेणे पसंत केले. आता मंगळवारपासून अवकाळी पाऊस पुन्हा बरसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात तर गारपीटीसह पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील बागायतदार अडचणीत सापडण्याची शक्यता पुन्हा दुणावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात मंगळवार कोरडा गेला असला, तरी या भागात उकाडा सुरु झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस दाखल होण्याची शक्यता शेतकऱ्यांसह हवामान खात्यानेही व्यक्त केली आहे. हवामान आधारित कृषी सल्ला समितीने कोकण परिसरात १६ मार्चपर्यंत हलक्या प्रमाणात गारपीट होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे परिपक्व झालेल्या फळांची त्वरित काढणी करून तो माल विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावा, असे आवाहन या समितीने केले आहे.हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज आणि काही तालुक्यांमधील सतत बदलते वातावरण यामुळे बागायतदार निराश झाला आहे. पुन्हा औषध फवारणी सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या बागायतदारांना पावसाने पुन्हा एक फटका दिला आहे.१५ दिवस विश्रांतीवर गेलेल्या पावसाने सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कब्जा सुरु केला आहे. बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर उर्वरित ठिकाणीही पावसाने आपली लक्षणे दाखवण्यास सुरूवात केली आहे. सध्या जिल्ह्यातून हापूस वाशी मार्केटच्या दिशेने आगेकूच करत असतानाच जिल्ह्यातील बागायतदारांसमोर पुन्हा पावसाचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजांमुळे बागायतदारांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)


मेघगर्जनेसह होणार पाऊस...
हवामान खात्याने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी १६ मार्चपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण वगळता इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या प्रमाणात गारपीट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे विशेष पत्र कृषी उपसंचालक (माहिती) पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुूळे कोकणात आणखी पाच दिवस तरी पावसाळी वातावरण राहणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Hail alert in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.