महाराष्ट्राच्या चेरापुंजीत पाऊस हजारी !
By admin | Published: July 3, 2017 01:10 PM2017-07-03T13:10:53+5:302017-07-03T13:10:53+5:30
महाबळेश्वरात संततधार : १ जून पासून १ हजार २१० मिलीमीटर पावसाची नोंद
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0३ : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला असून एक जून पासून आजपर्यंत याठिकाणी १ हजार २१० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून याठिकाणी पावसाची संततधार सुरू असून हळूहळू जोर वाढत आहे.
राज्यातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे शहर म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. दरवर्षी याठिकाणी ५ ते ६ हजार मिलीमीटर इतका पाउस पडतो. याठिकाणी कोसळणाऱ्या पावसामुळेच कोयना, वेण्णा, कृष्णा, सावित्री या नद्या पावसाळ्यात प्रवाहीत होतात.
यंदा जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता मान्सून सर्वत्र उशिरा उशीरा सक्रीय झाला. महाबळेश्वरातही पावसाने १० जून नंतर हजेरी लावली. येथील पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला असून सोमवार, दि. ३ जुलै पर्यंत याठिकाणी १ हजार २१० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात एक जून पासून आजपर्यंत २ हजार ९४० मिलीमीटर इतका पाऊस झाला असून त्यापैकी १ हजार २१० मिलीमीटर पाऊस एकट्या महाबळेश्वर तालुक्यात झाला आहे. पावसाची मजा लुटण्यासाठी हौशी पर्यटकांची विकेंडला महाबळेश्वर, पाचगणीत गर्दी होत आहे.