चोडणकरांच्या देखाव्यांची अर्धशतकी

By admin | Published: September 14, 2016 09:50 PM2016-09-14T21:50:43+5:302016-09-15T00:06:22+5:30

पुंडलिक देखावा यंदाचे आकर्षण : भाविक, पर्यटकांची गर्दी

Half-century | चोडणकरांच्या देखाव्यांची अर्धशतकी

चोडणकरांच्या देखाव्यांची अर्धशतकी

Next

प्रसन्न राणे - सावंतवाडी --गणेश चतुर्थीनिमित्त उभाबाजार-सावंतवाडी येथील महादेव ऊर्फ सोनू चोडणकर यांनी आपल्या निवासस्थानी सुरू केलेली हलत्या देखाव्यांची परंपरा आजही सुरू ठेवण्याचे काम त्यांचे सुपुत्र बाळ चोडणकर करीत आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखाव्यांचे यंदाचे ५१ वे वर्ष असून, त्यांनी साकारलेला यंदाचा ‘भक्त पुंडलिक’ देखावा आकर्षण ठरत आहे. देखावा पाहण्यासाठी रात्रंदिवस पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
सावंतवाडी शहरात पौराणिक कथांवर आजही देखावे सादर केले जातात. उभा बाजार-सावंतवाडी येथील बाळ चोडणकर यांचे वडील महादेव ऊर्फ सोनू चोडणकर यांनी १९६५ सालापूर्वी गणेश उत्सवाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी हलते देखावे तयार करण्यास सुरुवात केली. अनेक पौराणिक कथा, सामाजिक क्षेत्रातील विषयांवर हलते देखावे सादर केले. दरम्यान, १९७० साली सोनू चोडणकर यांचे निधन झाले. त्यानंतर बाळ चोडणकर यांनी आपल्या वडिलोपार्जित असणारी हलत्या देखाव्यांची परंपरा अशीच पुढे सुरू ठेवली. त्यांनीही एकापेक्षा एक असे पौराणिक कथांवर आधारित आकर्षक देखावे उभारण्यास सुरुवात केली. हलत्या देखाव्यांची ही परंपरा त्यांनी आजही कायम सुरु ठेवली आहे. यामध्ये त्यांना सहकारी बाबी आरोलकर यांची कायम साथ असते.
संत गोरा कुंभार, तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वर मुक्ताई, कृष्णजन्म, साईबाबा, नरहरी सोनार, वरद अवतार अशा प्रकारचे अनेक हलते देखावे दरवर्षी आवर्जून तयार करतात. देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यासह गोवा व कर्नाटकातील पर्यटक गर्दी करतात.
यंदा ‘भक्त पुंडलिक’ देखावा चोडणकर यांनी आपल्या निवासस्थानी सादर केला आहे. तो पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.
सोनबहावा प्रकल्प आयोजित ‘मंगलमूर्ती आरास’ स्पर्धेत चोडणकर यांनी २०१२, २०१३ व २०१४ साली असे सलग तीन वर्षे पौराणिक कथांवर आकर्षक देखावे सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला. या सोबतच अन्य विविध स्पर्धेतही देखाव्यांबाबतीत ते प्रथम क्रमांकावरच असतात.

Web Title: Half-century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.