स्थलांतरित कुटुंबांना मदतीचा हात
By admin | Published: May 12, 2016 10:29 PM2016-05-12T22:29:03+5:302016-05-12T23:44:03+5:30
कोकण कला, शिक्षण विकास संस्थेचा उपक्रम : शेकडो लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
बांदा : विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसत असून, तेथील जनता पाण्याअभावी इतर भागांमध्ये स्थलांतर करीत आहेत. नांदेड येथून मुंबई-घाटकोपर येथे आलेल्या स्थलांतरित शेकडो लोकांना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने खाऊचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच या कुटुंबीयांना शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी यावेळी दिले.यावर्षी भीषण दुष्काळ पडल्याने हजारो लोक आपल्या कुटुंबासह आपली गावे सोडून मुंबई परिसरात रहायला आली आहेत. या स्थलांतरित कुटुंबांची घाटकोपर येथील
मैदानात राहण्याची सोय करण्यात आली आहे. या कुटुंबांचा अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. समाजातील बरेच दाते या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी पुढे येत आहेत. अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था तसेच अंथरूण यांची गरज इथे मोठ्या प्रमाणात भासत आहे. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल हे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून नेहमीच मुंबई व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजूंना मदत करत असतात. तसेच ते शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करत
असतात.
यावेळी संस्थेचे महेश बिर्जे, विश्वनाथ बेटकर, सुधीर राणे,
राजेंद्र फणसगावकर, अन्वर
अन्सारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मदतीसाठी पुढे यावे
दुष्काळग्रस्तांच्या गरजा
जाणून घेऊन त्यांना तात्पुरते राहण्यासाठी तंबू, झोपण्यासाठी चटई, चादर, औषधे, अन्नधान्य आणि कपड्यांचे येत्या काही दिवसांत वाटप करण्यात येईल, असे आश्वासन कुबल यांनी दिले. मुंबई येथे अशा राहत असलेल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.