मालवणात १२ रोजी अपंगांसाठी शिबिर
By admin | Published: January 3, 2016 09:42 PM2016-01-03T21:42:14+5:302016-01-04T00:53:45+5:30
आमदार वैभव नाईक : ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग व्यक्तींची होणार तपासणी
मालवण : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुक्यातील अपंग व्यक्तींसाठी १२ जानेवारीला १० ते ५ या वेळेत ग्रामीण रुग्णालय येथे शिबिर घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात प्रथम सिंधुदुर्गातच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यानंतर आवश्यक कृत्रिम अवयव, साधने उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मालवणात अपंगांसाठी घेण्यात येणाऱ्या शिबिराच्या नियोजनासाठी आमदार वैभव नाईक मालवणात आले होते. शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख नंदू गवंडी, उदय दुखंडे, शिवा भोजने, श्वेता सावंत, बाबा सावंत, सुभाष धुरी, संतोष घाडी, किरण वाळके, मेघा सावंत, रश्मी परुळेकर, चारुशीला आचरेकर, शर्मिला गावकर, रामू सावंत, डॉ. गोपाळ सावंत, तुकाराम, आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, तालुक्यात ४८८ अपंग बांधव नोंदणीकृत आहेत. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. तपासणी केल्यानंतर ज्यांना कृत्रिम साधनाची आवश्यकता भासणार, त्यांना केंद्र शासनाच्यावतीने पुरविले जाणार आहे.
ज्यांना अपंग असलेल्याचा दाखला मिळाला नाही, त्यांनाही तो उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त अपंग बांधवांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन नाईक यांनी केले.
यावेळी आचरा, हिवाळे विभागाच्या उपतालुकाप्रमुखपदी किर्लोस येथील बाबा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)