जाचक अटींमुळे अपंगांची ससेहोलपट
By Admin | Published: April 25, 2017 10:57 PM2017-04-25T22:57:31+5:302017-04-25T22:57:31+5:30
जिल्ह्यातील १५ हजार अपंग समस्यांनी त्रस्त : कणकवली तालुक्यात ७२४ अपंग विद्यार्थ्यांचा समावेश
प्रदीप भोवड ल्ल कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे १५ हजाराहून अधिक अपंग असून हे अपंग शासनाच्या जाचक अटींना कंटाळले आहेत. एक तर नोकऱ्या नाहीत त्यामुळे उपजिविका करावी कशी असा मोठा प्रश्न अपंगासमोर आहे. उद्योग व्यवसायासाठी जिल्हा परिषद १५ हजार रुपये देते, परंतु मोठा उद्योगधंदा करण्याची इच्छा असूनही त्यामध्ये करता येत नाही. अपंग विकास महामंडळाच्या जाचक अटींमुळे अपंगांना अर्थसहाय्य मिळत नाही, अशा तक्रारी अपंगांनी केल्या आहेत.
अपंग महामंडळाच्या व्यवसायासाठी कर्जयोजना आहेत. अपंगांसाठी २ टक्के व्याज आहे, मात्र अटी जाचक असल्यामुळे त्या अटींची पूर्तता अपंग करू शकत नाहीत, त्यामुळे अपंग तरुण-तरुणी मेटाकुटीस आल्या आहेत.
सिंधुदुर्गातील एकाही लोकप्रतिनिधीला अपंग व्यक्तींची दया कशी येत नाही, असा सवाल साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केला आहे. आमदार बच्चू कडू सोडले तर एकाही आमदाराला अपंग मतदारांचे सोयरसुतक नाही याबद्दल अपंगांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अपंगांच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. सरकार अपंगांसाठी वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत साहित्य पुरवते, मात्र अपंगांच्या पुढील जीवनाचे काय याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दल अपंगांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या उदरनिर्वाहाचे काय, जीवन जगावे कसे, जे अपंग व्यवसाय करू शकतात त्यांना अर्थसहाय्य कोण करणार असा सवाल शिंगाडे यांनी केला आहे.
आमच्या अपंगत्वाची दया परमेश्वराला येईल. कोणी तरी दानशूर व्यक्ती सिंधुदुर्गात जन्माला येईल आणि अपंगांसाठी मदत करील, या आशेवर आम्ही जगत असल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.
आमदार, खासदार यांनी आपल्या निधीतून मदत दिली असती तर पतसंस्था उभी राहून कार्यशाळा सुरू झाली असती पण कुठल्याही आमदार, खासदाराला आम्हाला मदत करावीशी वाटत नाही. निवडणूक आली की आमदार, खासदारांना आमची आठवण होते.
निवडून आले की आम्हाला कोणीही विचारत नाही. मतांसाठी आम्हाला धरून धरून मतदान केंद्रावर नेतात. तेवढ्यापुरते घरी आणून सोडतात पण आमच्या उदरनिर्वाहाचे ते काहीही बघत नाहीत, असा संतापही अपंग बांधव व्यक्त करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांच्या विविध संस्था आहेत. सावंतवाडी, ओरोस, कणकवली, देवगड या ठिकाणी अपंगांचे काम करणाऱ्या व्यक्ती आहेत.
ओरोस येथे साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल शिंगाडे चालवत आहेत. देवगड येथे अपंग क्रांती संघटना श्रध्दा आंबेरकर चालवत आहेत. कणकवलीत सुरेश पाटणकर अपंग संघटनेला मदत करीत आहेत. या शिवाय सावंतवाडीत एक संस्था अपंगाचे कार्य करीत आहे. मात्र या संस्था अपंगांना साहित्यपुरवठा करण्यापलीकडे काहीही करीत नाहीत. अपंगांना व्यवसायासाठी जिल्हा परिषदेत काही प्रमाणात मदत केली जाते. ते सोडले तर कुठलीही संस्था अपंगांसाठी काहीही करीत नाही. कोणी तरी एक दोन हजाराची केव्हा तरी मदत करतात मात्र त्याने अपंगांच्या सर्व समस्या सुटत नाहीत, त्यामुळे अपंगांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अपंगांच्या साहित्याचे वाटप
कणकवली तालुक्यात २७ जणांना अपंगांचे ओळखपत्र देण्यात आले आहे. ३२ जणांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. रेल्वे प्रवासाची सवलत २५ जणांना मिळत आहे. ४ जणांना बूट, ६ जणांना श्रवणयंत्र, एकाला क्रेचेस, एकाला ब्रेल कीट, ४९ जणांना प्रमाणपत्र, ७ जणांना मदतनीस भत्ता, ४ जणांना कॅलिपर्स, ४५ जणांची बुध्द्यांक तपासणी, ७२ जणांची स्पिच थेरपी, २९ जणांना मोठ्या अक्षरातील पुस्तके, एकाला ट्रायसिकल, ५ जणांना रोलेटर,दोघाजणांना एमआरटी कीट, एकाला संसाधन कक्षासाठी संच, ९ जणांना श्रवण ऱ्हास चाचणी, १९ जिल्हा स्तर आॅल्म्किो शिबीर, अशा प्रकारची सुविधा कणकवली कार्यालयातर्फे अपंगांना देण्यात आल्या आहेत.
लोकप्रतिनिधींकडून वाटाण्याच्या अक्षता
अपंगांना लोकप्रतिनिधींकडून मात्र वाटाण्याच्या अक्षताच पदरात पडत असल्याचा आरोप साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केला आहे. अपंगांच्या प्रगतीसाठी जिल्ह्यात कोणी काहीही मदत करीत नाहीत.
आमदार, खासदार यांच्या निधीतून आम्हाला आर्थिक मदत मिळाली असती तर अपंगांसाठी कार्यशाळा सुरू करण्याचा विचार होता. जे २५ टक्के, ५0 टक्के अपंग आहेत, त्यांना उद्योगधंद्याचे प्रशिक्षण देण्याचा साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा मानस होता पण जिल्ह्यातील एकही दानशूर व्यक्ती मदत करीत नाही. अपंगांच्या मदतीसाठी एक पतसंस्थाही सुरू करण्याचा मानस होता, असेही शिंगाडे म्हणाले.
कणकवलीत ७२४ अपंग विद्यार्थी
कणकवली तालुक्यात ७२४ अपंग असून या अपंगाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र कणकवलीतर्फे प्रयत्न सुरू आहेत.
१८ वर्ष वयापर्यंतच्या मुलांना अपंगांचे साहित्य पुरवले जाते, अशी माहिती सर्व शिक्षा अभियानच्या विशेष तज्ज्ञ वंदना निकम यांनी दिली. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत होते. मात्र, १८ वर्ष वयानंतर या अपंगांकडे दुर्लक्ष होत आहे.
लोकप्रतिनिधी मदत करीत नसल्याबद्दल आश्चर्य
आमदार, खासदार आपल्या निधीतून कोट्यवधीची उड्डाणे करीत असतात, पण अपंगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी ५ लाखाचेही अर्थसहाय्य करीत नाहीत.
जर एखाद्या आमदार खासदाराने आम्हाला ५ लाख अर्थसहाय्य दिले असते तर आम्ही अपंगांची पतसंस्था स्थापन करून कार्यशाळा सुरू केली असती, पण आम्ही यापूर्वी लोकप्रतिनिधींना भेटूनही पाहिले. मात्र कोणीही मदत करीत नाही याबद्दल अपंगांनी खंत व्यक्त केली.