हस्तकला वास्तूला वाळवीने घेरले

By admin | Published: March 31, 2015 09:40 PM2015-03-31T21:40:18+5:302015-04-01T00:09:48+5:30

रघुनाथ मार्केटची अवस्था बिकट : बाहेरच्या काचा फुटल्या, एसी गंजले--लोकमत विशेष

The handicraft house surrounds the wand | हस्तकला वास्तूला वाळवीने घेरले

हस्तकला वास्तूला वाळवीने घेरले

Next

प्रसन्न राणे - सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक व पारंपरिक हस्तकलेची जोपासना व्हावी, त्यातून तयार होणाऱ्या वस्तंूची विक्री परप्रांतात व्हावी, यासाठी येथील उभाबाजारात रघुनाथ मार्केटची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला उभारून दहा वर्षे झाली, तरी या प्रकल्पात ना वस्तू विक्री ना प्रदर्शन तसेच आतील सामानालाही वाळवी लागली असून, एसीही गंजले आहेत. तर बाहेरील काचाही फुटल्या आहेत. लाकडी खेळणी हा सावंतवाडी पॅटर्न आहे. लाकडी खेळणी देशविदेशात प्रसिद्ध आहेत. जगाच्या नकाशावरही सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक खास लाकडी खेळण्यांच्या खरेदीसाठी सावंतवाडी शहरात येतात. यासारख्या अनेक कला सावंतवाडी शहरात उदयास आल्या आहेत. या कलेतूनच शहराची ओळख निर्माण झाली आहे. सावंतवाडी शहरात निर्माण झालेल्या पारंपरिक कला, हस्तकलेच्या वस्तू एकत्रित करून जगभरात विकल्या जाव्यात व सावंतवाडी शहराचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी येथील उभाबाजार येथील रघुनाथ मार्केट इमारत अद्ययावत करण्यात आली होती. यासाठी कोकण विकास पॅकेज अंतर्गत २००४ साली ३५ लाख रुपये खर्ची घालण्यात आले होते. पण गेल्या दहा वर्षात ही वास्तू बंद अवस्थेत आहे. कोणत्याही प्रकारच्या हस्तकलेची निर्मिती यातून होताना दिसून येत नाही.
सावंतवाडी शहरातील पारंपरिक कलेला प्रोत्साहन देत स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेला हा रघुनाथ मार्केट प्रक ल्प बंदावस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.
हा प्रकल्प सुरू केल्यास सावंतवाडी शहरासोबत जिल्हाभरातील कलाकारांकडून या प्रकल्पास प्रतिसाद मिळू शकतो. ३५ लाख रुपये खर्ची घालून शासनाचा पैसा वाया घालविण्यापेक्षा यातून आर्थिक नफा मिळविण्याचा विचार संंबंधित प्रशासनाने करून याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. रघुनाथ मार्केटमध्ये लाखो रुपये खर्च करून एसी बसवण्यात आले होते. ते एसी आता दिसत नाहीत. तर बाहेरून मार्केटला लावण्यात आलेल्या काचा फुटून गेल्या आहेत. आतील लाकडी फर्निचरला वाळवीने ग्रासले असून हे मार्केट काही वर्षांनी अस्तित्वहीन होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाचे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेली ही आलिशान इमारत आता धूळखात पडली आहे.

रघुनाथ मार्केटसारखे सावंतवाडीतील अनेक बंद प्रकल्प फलकांवर दाखवून पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. जनतेच्या निधीतून उभारलेले हे प्रकल्प बंदावस्थेत ठेवून जनतेचा पैसा वाया घालविण्याचे काम संबंधित प्रशासन करीत आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या अशा प्रकल्पांचा पर्यटनासाठी कोणताही फायदा नाही. रघुनाथ मार्केट प्रकल्प पंधरा वर्षे बंदावस्थेत असून यामुळे सावंतवाडीतील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
- राजू पनवेलकर
व्यावसायिक, सावंतवाडी

समस्या सावंतवाडीच्याउपासमारीची वेळ

सावंतवाडीमध्ये स्थानिक नागरिकांनी तयार झालेली शिल्पे, हस्तकौशल्याने बनविलेल्या वस्तू मार्केटच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना दाखविण्यासाठी रघुनाथ मार्केटचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, रघुनाथ मार्केट बंद असल्याने स्थानिक कलाकारांना आपली कला मांडणे अशक्य झाले आहे. यातून काही कलाकारांना रोजगाराची संधी निर्माण करता आली असती. मात्र, प्रकल्पच बंद असल्याने युवकांसमवेत कलाकारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. सावंतवाडी शहरातील पर्यटनस्थळांमध्ये रघुनाथ मार्केटची ओळख करून दिली जाते. मात्र, वास्तवात याठिकाणी कोणताही प्रकल्प नसल्याने पर्यटकांची संख्या कमी होत आहे. यामुळे शहरातील बंद प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे. यातून शहरात पर्यटक संख्या वाढून लघुउद्योजकांद्वारे शहरातील आर्थिक सुलभता वाढविणे शक्य होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Web Title: The handicraft house surrounds the wand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.