मानवी मनाला भजनातून अतीव समाधान मिळते

By admin | Published: October 26, 2015 11:32 PM2015-10-26T23:32:58+5:302015-10-27T00:13:12+5:30

शंकरराव वैरागकर यांच्याशी संवाद : कसालमधील भजन जुगलबंदी भजन रसिकांसाठी प्रेरणादायी

Happiness gets great satisfaction from human psyche | मानवी मनाला भजनातून अतीव समाधान मिळते

मानवी मनाला भजनातून अतीव समाधान मिळते

Next

गिरीश परब-सिंधुदुर्गनगरी -एकाच लयीत लावलेले तानपुरे व त्यांच्या स्वरात चाललेला आमचा गुंजारव ऐकून तल्लीन होणाऱ्या समोरच्या श्रोत्यांमध्ये साक्षात पांडुरंग असतो. तो संवाद आत्म्याची एक वेगळीच अनुभूती देतो. म्हणूनच मानवी मनाला अतीव समाधान भजनातून मिळते, असे उद्गार प्रसिद्ध संगीत भजन गायक पंडित शंकरराव वैरागकर (आप्पा) यांनी काढले.
वयाच्या ७१ व्या वर्षी भजनातून साक्षात पांडुरंगाला तल्लीन करणाऱ्या ‘आप्पांचा’ उत्साह एखाद्या विशीतल्या तरुणासारखा दिसत होता. कसाल येथील पावणाई रवळनाथ मंदिरात सांप्रदायिक भजन जुगलबंदी कार्यक्रमात पंडित शंकरराव वैरागकर व तानाजी जाधव यांचे बहारदार भजन झाले. कोकणी भजनी संस्कृती ही वेगळी आहे तर सांप्रदायिक भजन संस्कृती वेगळी आहे. शास्त्रीय संगीताचा आधार घेत संतांचे अभंग नादरुपाने श्रोत्यांना सोपे करून सांगण्याचे काम दोघांनी केले. यावेळी कसाल पंचक्रोशीतील हजारो श्रोत्यांचे कान तृप्त झाले. आपल्या संगीत साधनेविषयी दोघांशी साधलेले हे हितगुज...
पंडित शंकरराव वैरागकर (आप्पा)
सिंधुदुर्गात म्हणजेच तळकोकणात प्रथमच आलेल्या आप्पांना सिंधुदुर्गच्या आसमंतातील संगीताने लुब्ध केले. एकतारी भजनाची परंपरा असलेल्या आप्पांच्या घराण्यात शैव पंथाचा पगडा होता. वयाच्या दोन वर्षापासून कोणताही गुरु न घेता मोडकी तोडकी हातपेटी वाजविणे व गाणे म्हणणे हा त्यांचा छंद होता.
त्याकाळी लातूरसारख्या जिल्ह्यात सावकारी असलेल्या वैरागकरांच्या घराण्यात गाणे म्हणणारा व त्यात तल्लीन होणारा कोणी जन्मला नव्हता. आपला मुलगा वकील किंवा डॉक्टर व्हावा अशी अपेक्षा असणाऱ्या घराण्यातून आपल्याला संगीत साधना करता येणार नाही म्हणून १० वर्षांचे असताना आप्पांनी घरातून पलायन केले व पंडित बसवराज राजगुरु (सोलापूर) यांच्याकडे संगीत साधना सुरु केली. त्यानंतर गदग येथे व्यंकटेशकुमार व पुणे येथे पद्माकर कुलकर्णी यांच्याकडेही ते संगीत शिकले. यावेळी सावकारी असलेल्या या साधकानी प्रसंगी पोट भरण्यासाठी पर्वतीला भीकही मागितली. याचवेळी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या मैफिलीमध्ये तानपुरा वाजविण्याची संधी त्यांना मिळाली आणि तेथून त्यांच्या एका वेगळ्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली. कलकत्त्याला पंडित व्ही. जी. जोग यांच्याकडे शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यावर रशिद खाँ, गिरीजादेवी अशा मातब्बर गायकांच्या सान्निध्यात संगीत साधना करता आली.
प्रा. तानाजी जाधव
शब्द, तान आणि खर्जापासून तारसप्तकापर्यंत फिरणारा मोकळा आवाज अशी ओळख असलेल्या प्राध्यापक तानाजी जाधव यांनी या जुगलबंदीमध्ये एक वेगळेच भावविश्व निर्माण केले. उत्तराखंड येथे एका आंतरराष्ट्रीय शाळेत संगीत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या तानाजी जाधव यांनी दोन दिवसांचा प्रवास करून कसालसारख्या एका छोटेखानी गावातील श्रोत्यांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपला शिणवटा कुठच्या कुठे पळून गेला असेही ते विनयाने म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील पाटमेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील तानाजी जाधव यांचे आजोबा दरबार गायक होते. त्यामुळे गायनाची परंपरा घराण्यातूनच मिळाली. सांप्रदायिक भजन वेगळे आहे. यामध्ये असलेले रुपाचे, ध्यानाचे अभंग, संत अभंग, गौळण, उपदेशपर अभंग यातील शब्दांच्या भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे म्हणजेच देवाला आपलेसे करून घेणे आहे. भावार्थ लक्षात घेऊन ज्यावेळी आपण संगीत गातो तो एक अवर्णनीय आनंद असतो असेही ते म्हणाले. आताच्या भजनांमध्ये काहीवेळा सिनेमातील गाण्यांच्या चालींचा वापर होतो त्याला प्रसारमाध्यमे कारणीभूत आहेत. मात्र परमेश्वराच्याजवळ जाण्याच्या दृष्टीने संगीताला शास्त्रीय संगीताबरोबरच आध्यात्मिकतेचा बाज असणे आवश्यक आहे. असेही तानाजी जाधव यांनी सांगितले.

Web Title: Happiness gets great satisfaction from human psyche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.