दिवाळीत आॅनलाईनला पसंती

By Admin | Published: November 17, 2015 09:08 PM2015-11-17T21:08:33+5:302015-11-18T00:09:56+5:30

ग्राहकांचा ओढा वाढला : आवश्यक वस्तू मिळताहेत माफक दरात

Happy Diwali online | दिवाळीत आॅनलाईनला पसंती

दिवाळीत आॅनलाईनला पसंती

googlenewsNext

प्रसन्न राणे -- सावंतवाडी -दिवाळी म्हटले की नवनवीन वस्तूंची खरेदी हमखास. पण महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांचा ओढा कायमच स्वस्ताईकडे असतो. त्यामुळे आपणास हवा असणारा माल स्वस्तात मिळण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू असते. यंदाच्या दिवाळीत माफक दरात आपणास हवी असणारी वस्तू मिळविण्यासाठी आॅनलाईन शॉपिंगचे जाळे शहरांबरोबरच आता गावागावांत पसरल्याचे यावेळी दिसून आले. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी आॅनलाईन शॉपिंग करण्यावर भर दिल्याने स्थानिक बाजारपेठेसह व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय यंदाच्या आॅनलाईन खरेदीत एकही तक्रार झाली नाही की कुणी हरकत घेतली नाही. तसेच कुरिअर कंपन्यांनीही याबाबत केलेल्या पाठपुराव्याने युवावर्गासह आता ज्येष्ठांचाही आॅनलाईन खरेदीला ग्रीन सिग्नल मिळत आहे.
आॅनलाईन शॉपिंगचा व्यवसाय कित्येक दिवस सुरू आहे. पण सामान्यांत याबाबत विश्वासार्हता नव्हती. दर्जेदार मालाची हमी नसल्याने आॅनलाईन खरेदी म्हणजे जुगार मानला जायचा. पण हाच जुगार आता उत्कृष्ट खरेदीच्या रूपात परावर्तीत होत आहे. याचे कारण म्हणजे मालाची माफक किंमत, मालाचा किफायतशीर दर्जा आणि घरपोच केला जाणारा माल, ही मुख्य कारणे आॅनलाईन शॉपिंगच्या वृद्धीसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे आॅनलाईनचे जाळे हळूहळू पसरत आहे. संबंधित कंपन्यांनी कुरिअर कंपन्यांच्या मदतीने दिलेली सेवाही यासाठी महत्त्वाची आहे. घराघरात स्मार्टफोन मोबाईल असल्याने प्रत्येजकण मोबाईलमध्ये असणाऱ्या विविध इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून जोमात शॉपिंग करताना दिसत आहे. आॅनलाईन शॉपिंगमध्ये एकाच जागी बसून हवी ती वस्तू शोधून मागविल्याने ती वस्तू ग्राहकांच्या हातात येईपर्यंत अवघे चार दिवस लागतात. वस्तू घरपोच आल्यावर पैसे द्यावे लागत असल्याने चार दिवसांच्या कालावधीत ग्राहकांना पैशाची तडजोड करता येते.
यंदाच्या दिवाळी सणाला तर काही इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून काही वस्तूंवर ६० ते ९० टक्के सूट असल्याने आॅनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची दिवाळी उत्साहात साजरी झाली. यंदाची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली तीही आॅनलाईन शॉपिंगनेच. सध्या प्रत्येक कुरिअर कंपनीकडे दिवसाला ३०० ते ४०० आॅनलाईन शॉपिंगच्या कुरिअर वस्तंूची पार्सले ग्राहकांना पोहोच करावी लागत आहेत. आॅनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्याचवेळा ग्राहक बाहेर असल्याने किंवा ग्राहकांकडे पैशाची तडजोड न झाल्याने ग्राहक वस्तू स्वीकारू शकत नाही. यावेळी त्या वस्तूचे भाडे उत्पादक कंपनीकडून घेतले जाते. उत्पादनाबद्दल काही तक्रार आल्यास आणि आलेली वस्तू परत करायची असल्यास तशी व्यवस्थाही आता अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली आहे.
आॅनलाईन खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेला चांगलाच मार बसला आहे. मालाची किंमत स्वस्त करण्याचे धोरण त्यांना अवलंबण्याची गरज आहे. पण यामध्ये त्यांचा फायद्याचे वांदे होण्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहेत. एकंदरीत स्थानिक बाजारपेठेतील खरेदीसमोर आता आॅनलाईनचे संकट उभे राहिले आहे, हे मात्र नक्की.

घरपोच वस्तू : सामान्य ग्राहकांमध्ये समाधान
आॅनलाईन शॉपिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक वस्तू, लेडीज-जेन्टस कपडे, नेकलेस, मोबाईल, संगणक, महागड्या सर्व वस्तू, कपाटे, साड्या, सौंदर्यप्रसाधने साहित्य, विद्युत रोषणाईची माळा, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, यापेक्षा अधिक नवनवीन वस्तू आॅनलाईन शॉपिंगद्वारे मिळतात आणि या वस्तू आता ग्रामीण भागातही सहज पोहोचत आहेत. आॅनलाईनच्या या खरेदीमुळे ग्राहकांना माफक दरात हवा असणारा माल तर मिळालाच, पण तोही घरपोच आल्याने याबाबतही जनसामान्यांत समाधानाचे वातावरण आहे.

आॅनलाईन खरेदीमधून सध्या दिवसाला २५० ते ३०० पेक्षा जास्त पार्सल येत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या ई-कॉम सर्व्हिसला प्रारंभ केला असून, ग्राहकांची संख्या वाढली आहे. यामध्ये युवा वर्गाचा जास्त समावेश आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देण्याचे काम आॅनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून करावे लागत आहे.
-सुहास तुळसकर, एरिया मॅनेजर, ई-कॉम एक्स्प्रेस

Web Title: Happy Diwali online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.