'सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा...;' बॅनरची होतेय जबरदस्त चर्चा! जाणून घ्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:20 PM2021-12-22T22:20:54+5:302021-12-22T22:24:17+5:30
सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता.
सावंतवाडी- पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा अनोख्या बॅनरने सर्वाचे लक्ष वेधून घेतले या बॅनरची चर्चा मात्र शहरातील नाक्यानाक्यावर सुरू होती. काहिनी तर या बॅनरचा फोटो घेत सर्वत्र व्हायरल केला होता. मात्र हा बॅनर पालिकेसमोरच लावल्याने अखेर प्रशासनाकडून तो जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता. पालिका प्रशासनाने तो स्टाँल अनधिकृत ठरवत हटविला होता यासंदर्भात जाधव यांनी अकरा दिवस पालिका इमारतीसमोर मोती तलावा काठी भर पावसात उपोषणही केले होते.
त्यावेळी जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करतांना आपल्यावर अन्याय केल्याचे म्हटले होते. आज सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच त्यांचा ठळक स्वरुपातील सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा बॅनर चर्चेचा ठरला. जाधव यांनी सकाळीच हा बॅनर पालिकेसमोर लावताच प्रशासनाकडून तो हटविण्यात आला.
जाधव यांनी लावलेल्या बॅनरवर, छत्रपती शिवाजी महाराज हे दिन दलितांचे कैवारी होते, उच्च निच्च, असा भेदभाव त्यांनी कधीच केले नाही. परंतु समाजाती काही लोक स्वार्था पायी एकीकडे छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव घेवून दुसरीकडे गोर गरीबांना छळतात. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहीली तरी देखील, आज ही आम्हाला न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये गोर गरीब आम्हा स्थानिक व्यापाऱ्यांना काही सत्ताधारी लोकांनी कशाप्रकारे उध्वस्त केल होत. हे साऱ्या जनतेने पाहीले आहे. न्यायासाठी लढत असताना माझ्या काळजी पोटी ११ ही दिवस भर रस्त्यात माझ्या आईच्या डोळ्यातून पडलेल्या त्या अश्रुंना मी कधीही विसरू शकणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोर गरीबांना आधार दिला, म्हणून सर्व सामान्य जनतेच्या व विरोधकांच्याही हृदयात त्यांना आजही एक विशिष्ट स्थान आहे. मी एक उच्च शिक्षित सामाजीक कार्यकरता आहे. हा माझा संघर्ष कुटच्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून आम्हा स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आहे,' असा मजकूर लिहीला होता.