हापूसचा दर पुन्हा वधारला; आवक घटली, मागणी वाढली, अद्यापही १२०० रुपये प्रती डझन

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 5, 2023 08:09 PM2023-05-05T20:09:16+5:302023-05-05T20:10:55+5:30

मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते.

hapus alphonso mango rate rise again but inflows down demand up still rs1200 per dozen | हापूसचा दर पुन्हा वधारला; आवक घटली, मागणी वाढली, अद्यापही १२०० रुपये प्रती डझन

हापूसचा दर पुन्हा वधारला; आवक घटली, मागणी वाढली, अद्यापही १२०० रुपये प्रती डझन

googlenewsNext

महेश सरनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, सिंधुदुर्ग : मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते. त्यामुळे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत असणारे खवय्ये या महिन्यात हमखास आंब्यावर ताव मारण्यास सुरुवात करतात. यावर्षी मात्र, परिस्थिती उलट दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात काही प्रमाणात स्वस्त झालेला हापूस मे मध्ये पुन्हा महागला आहे.

तापमान वाढ आणि ऐन बहराच्या हंगामात पडलेला अवकाळी पाऊस या बदलेल्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात बाजारात हापूसच आला नाही. तर आता मे महिन्याच्या सुरुवातीला हंगामातील शेवटचा आंबा बाजारात आला खरा, परंतु हापूसचा दर बिल्कूल कमी झालेला नाही. अद्यापही हापूस आंबा १२०० रुपये डझनने बाजारात येत असल्याने यावर्षी स्थानिकांना हापूसची चव चाखण्यासाठी मोठे पैसे मोजावे लागत आहेत.

हापूस हंगाम १५ मे पर्यंत

प्रतिकूल हवामान, बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंब्यावर मोठ्या प्रमाणावर काळे डाग पडले आहेत. शंभर आंब्यामागे ३५ आंबे असे सापडू लागले आहेत आणि ते आंबे फेकून द्यावे लागत आहेत. तर थ्रीप्सच्या (फुलकिडी) आक्रमणापासून पीक वाचविण्यासाठी कीटकनाशक फवारण्यांची संख्या वाढली. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. या बदलांमुळे आंबा हंगाम १५ मे पर्यंत राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दर पुन्हा १२०० रुपयांवर

यावर्षी मार्च महिन्यात हापूस आवक झाली. त्यावेळी पाच ते सहा डझन पेटीचे दर ८ ते १२ हजार रुपये, तर डझन आंब्याचे दर १००० ते १५०० रुपयांपर्यंत होते. एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढली आणि दर खाली उतरले. पाच ते सात डझनच्या पेटीचे दर ३ ते ६ हजार रुपये, तर एक डझन आंब्याचे दर ८०० ते १२०० रुपये झाले. हापूसची मागणी वाढू लागली आणि आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर पुन्हा वधारून १२०० रुपये डझनापर्यंत पोहोचले आहेत.

बाजारात येताच हातोहात विक्री

आता हापूसचा शेवटचा हंगाम सुरू असून, बाजारात आंबाच नसल्याने असलेल्या आंब्याला प्रचंड मागणी वाढल्याने डझनाचे दर आता १२०० पर्यंत पोहोचले आहेत. कडक उन्हाळा सुरू असल्याने आंबा काढल्यानंतर लगेच दोन दिवसांत तयार होत असल्याने मार्केटमध्ये आलेला आंबा हातोहात संपत आहे.

अवकाळी पावसानंतर कडाक्याचा उष्मा आणि ढगाळ वातावरण सातत्याने आहे. या बदलांमुळे २० ते २५ टक्के इतकेच पीक हाती लागेल. परिणामी हापूसचा दर आता हजाराच्या खाली येणे शक्य नाही. - अयोध्याप्रसाद गावकर, आंबा बागायतदार.

Web Title: hapus alphonso mango rate rise again but inflows down demand up still rs1200 per dozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.