हापूसला ‘कर्नाटकी’ आव्हान
By admin | Published: April 12, 2016 11:50 PM2016-04-12T23:50:10+5:302016-04-13T00:12:21+5:30
रत्नागिरी अल्फान्सो : जिओग्राफीक इंडिकेशनसाठी बागायतदारांचे प्रयत्न
रत्नागिरी : रत्नागिरी हापूस आंब्यासमोर तशाच दिसणाऱ्या परंतु दर्जात कोणतीही बरोबरी होऊ न शकणाऱ्या कर्नाटकी हापूसने तगडे आव्हान उभे केले आहे. फळांचा राजा म्हणून देशात नव्हे; तर परदेशातही रत्नागिरी हापूसने नावलौकिक मिळविला आहे. मात्र, चव व दर्जा नसतानाही कर्नाटक हापूस हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जात आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या रत्नागिरी हापूसची बदनामी होत आहे. त्यावर जिओग्राफीक इंडिकेशन अर्थात भौगोलिक सांकेतांक वापरण्याचा पर्याय पुढे आला असून, शासनाकडे तशी मागणी केली जाणार आहे.
कोकणातून हापूसची रोपे नेवून कर्नाटकात हापूसचे पीक घेतले जात आहे. मोठ्या प्रमाणात कर्नाटकचा हापूस सध्या बाजारात आहे.
कोकणातून ७० टक्के हापूस हा आखातात निर्यात केला जातो. मात्र, त्यामध्येही कर्नाटक हापूसची घुसखोरी होत आहे. तसेच कोकणातील काही भागातूनही कोवळा हापूस पाठविण्याचे प्रकारही होत आहेत. अशा हापूसमुळे चांगल्या प्रकारे पीक घेऊन आखातात पाठविलेल्या रत्नागिरी हापूसची बदनामी होत असून, त्याचा दर कमी होण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
कर्नाटक हापूस आहे तरी काय, याबाबत रत्नागिरीतील आंबा बागायतदारांकडून माहिती घेतली असता बेचव असा हा हापूस असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. रत्नागिरी हापूससारखाच दिसणारा हा कर्नाटक हापूस असून, हिरवा असताना रत्नागिरी व कर्नाटक हापूसमधील फरक सहसा ओळखता येत नाही. पिकल्यानंतर मात्र काही प्रमाणात वेगळ्या रंगामुळे कर्नाटकचा हापूस ओळखता येतो. रत्नागिरी हापूसची साल पातळ असून, पिकल्यानंतर त्याला मोहक घमघमाट सुटतो. मात्र, कर्नाटक हापूसची साल जाड असून, पिकल्यानंतरही त्याला घमघमाट तर सोडाच परंतु कोणताही गंध येत नाही. चवीलाही रत्नागिरी हापूसशी कोणतीही बरोबरी करू न शकणारा कर्नाटक हापूस असल्याचे बागायतदारांप्रमाणेच हापूस खवय्यांचेही मत आहे.
परंतु समान दिसण्यामुळे व रत्नागिरी हापूस येण्याआधीच बाजारात येणाऱ्या कर्नाटक हापूसच्या कमी दरामुळे ग्राहकांना अस्सल रत्नागिरी हापूसचा स्वाद घेता येत नाही. रत्नागिरी हापूसची पत आखातात टिकून राहावी व बदनामी टळावी म्हणूनच जिओग्राफीक इंडिकेशनचा पर्याय पुढे आला आहे. त्याला शासनाकडून प्रतिसाद मिळतो की नाही, यावरच रत्नागिरी हापूसचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)
रोखणार कसे : कोवळा हापूसही बाजारात
आखातात दरवर्षी ७० टक्के हापूसची निर्यात
कर्नाटकी हापूसमुळे रत्नागिरी हापूसची बदनामी
लंगडा, दसेहरा आंबाही बाजारात दाखल
भौगोलिक सांकेतांकाबाबत हापूस बागायतदारांना शासनाकडून निर्णयाची आशा
कर्नाटक हापूसप्रमाणेच रत्नागिरी हापूससमोर केसर, लंगडा, दसेहरा यांसारख्या अन्य प्रांतातील आंब्यांचेही आव्हान निर्माण झाले आहे.