हापूसला साडेसाती!
By admin | Published: February 15, 2016 09:57 PM2016-02-15T21:57:07+5:302016-02-15T23:55:24+5:30
बागायतदार चिंतेत : गारठा वाढल्याने फळांची गळ सुरु
रत्नागिरी : हवामानात अचानक गारठा वाढल्यामुळे हापूसची साडेसाती वाढली आहे. थंडीमुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मोहोर येत असल्यामुळे फळांची गळ वाढली आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.गेले दोन दिवस मळभी वातावरण असल्यामुळे मोहोरावर कीड, भुरी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे पुनर्मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुनर्मोहोरामुळे आधीच्या मोहोरावर परिणाम होत आहे. शिवाय मोहोराला लागलेली फळे थंडीमुळे गळत आहेत. ही फळे वाचवण्यासाठी तसेच मोहोराचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. दरम्यान, सध्या नव्याने येणाऱ्या मोहोरास फळधारणा अल्प आहे. हा आंबा मे मध्ये तयार होणार आहे, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. लवकर पीक येण्यासाठी वापरलेल्या कृषी संजीवकांमुळे पावसाअभावी सुरुवातीला आलेल्या मोहोरावर कोणताही परिणाम झाला नाही. शिवाय फळांचेही रक्षण झाले. यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, आता आंब्याची आवक मंदावली आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, अथवा मे महिन्यात सरसकट आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे आंबा लवकर बाजारात आला तर चांगला दर मिळतो. मात्र, आवक वाढली तर दर घसरण्याची भीती आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला आहे. सुरुवातीचा आंबा उन्हामुळे लवकर तयार झाला. मात्र, आवक मंदावणार आहे.
सुरुवातीचा हापूस आंबा असूनही ५०० ते १००० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. मार्चपर्यंत हापूसची ही आवक सुरू राहिली तरी प्रमाण अल्प असणार आहे. मार्चपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
धोक्याची घंटा?
हापूसला प्रतिवर्षी सुरुवातीपासूनच अडचणींचा प्रवास सुरु होतो. यंदाही वाढलेल्या थंडीने हापूससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यामुळे भविष्यात हापूसचे उत्पादन किती येणार? याची चिंता आता बागायतदारांना सतावू लागली आहे.
हवेत गारठा : आंब्याची गळ
हापूसची नुकतीच परदेशात निर्यात सुरू झाली आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा पिकावर परिणाम होत आहे. अतिथंडी तसेच अतिउष्मा आंबा पिकाला मारक आहे. थंडीमुळे गळ, कडक उन्हामुळे आंबा भाजणे, तर पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे. निसर्गावर अवलंबून असणारे पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असले तरी निसर्गापुढे सर्वच हतबल आहेत.
- प्रदीप सावंत,
बागायतदार
बऱ्याच फळांची गळ?
गारठा असाच सुरु राहिला तर पहिल्या मोहोराचा आंबा बऱ्याचअंशी गळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.