कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे पराभव

By admin | Published: December 12, 2014 10:04 PM2014-12-12T22:04:43+5:302014-12-12T23:45:34+5:30

नारायण राणे : कुडाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

Harassed by the negligence of activists | कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे पराभव

कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे पराभव

Next

कुडाळ : आजपर्यंत चांगली कामे करीत आलो असून चांगले नाव कमावले. अनेक दिग्गजांना मागे टाकून स्पर्धेत राहिलो. मात्र, विधानसभेत झालेला माझा पराभव हा कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळेच झाला, असे परखड मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील काँग्रेसच्या मेळाव्यात केले. कार्यकर्त्याचा मुखवटा घालून काम करणाऱ्या बदनाम लोकांच्या टीमला मी सोबत का घेऊ, असा सवालही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना करीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांच्या कार्यशैलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकांअगोदरच मला निकाल लक्षात आला होता. मात्र, दोन दिवसात मी जनतेचे मत बदलू शकत नव्हतो. येथे कार्यकर्त्यांपेक्षा ठेकेदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असेही ते म्हणाले.
हा पराभव राणेंचा की कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणाचा याचा विचार करा व मुखवटे घालून फिरू नका. मी सर्व पाहतो आहे. कार्यकर्त्यांचा पिंड असेल, तर कधीही पराभव जवळ येत नाही. तुम्हाला सरपंच झालात की मस्ती येते. मी कोणालाही परका मानले नाही. या जिल्ह्याला कुटुंबच मानून सेवा केली. मात्र, याच जिल्ह्यात पराभव होईल, असे मला कधी वाटले नव्हते.
माझा पराभव सोपा नसून हे काम कुणीही करू शकत नाही. आता विधानसभेत येऊन गेलेली माणसे हत्तीच्या वासानेच पळणारी आहेत, असा टोलाही त्यांनी येथील लोकप्रतिनिधींना लगावला.
कार्यकर्ता कसा असावा, या संदर्भातील डॉ. हेगडेवार यांचे पुस्तक मी वाचले असून आपणही वाचून आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. नारायण घडायला ४८ वर्षे लागली, परंतु पराभव व्हायला एक क्षण लागला, असेही ते म्हणाले.
आमदार सुभाष चव्हाण म्हणाले, पक्षात चार चांगली माणसे असली, तरी चालतील, परंतु बेईमान माणसे नकोत. संदेश पारकर यांनी राणेंच्या पराभवाला कार्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगितले. कोणतेही विकासाचे काम न करता विरोधकांना विजय मिळाला, याबाबत सतीश सावंत यांनी खंत व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष स्रेहलता चोरगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दिप्ती पडते, आनंद शिरवलकर व इतर पदाधिकारी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Harassed by the negligence of activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.