जिल्हाधिकारी भवनसमोर उपोषणे
By admin | Published: May 3, 2016 09:50 PM2016-05-03T21:50:56+5:302016-05-04T00:34:12+5:30
पालकमंत्र्यांचे आश्वासन : महाराष्ट्रदिनी विविध प्रलंबित प्रश्नी लक्ष वेधले
सिंधुदुर्गनगरी : विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १ मे या महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी भवनसमोर पाच उपोषणे झाली. दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने सर्व उपोषणे मागे घेतली.नारायण तलावाच्या बांधकामात अनियमिततावेंगुर्ले शहराला बारमाही पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन नारायण तलावाच्या बांधकामात अनियमितता आली आहे.त्यामुळे वेंगुर्ले शहराला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप वेंगुर्ले नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी केला आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधले आहे. तसेच पावसाच्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण करणे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) व निशाण तलावातील गाळ काढणे, आदी उपाययोजनाही सुचविल्या. मात्र, याकडेही प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला असल्याचे हुले यांनी स्पष्ट केले. हुले यांच्याबरोबरच वेंगुर्ले नागरी कृती समितीचे उपाध्यक्ष भाई मोरजे, सचिव प्रदीप वेंगुर्लेकर, सहसचिव संजय तानावडे, सहखजिनदार राजन वालावलकर उपोषणात सहभागी झाले होते. वेंगुर्ले येथे बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याने उपोषण स्थगित केले.
नेरूर ग्रामपंचायतीविरोधात विनोद गावडे यांचे उपोषणअनधिकृत बांधकामाकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी नेरूर गणेशवाडी येथील विनोद भानू गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नं. ९०, हिस्सा नं. ३ मध्ये वामन गावडे यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी एका इमारतीच्या अनधिकृत बांधकामास सुरुवात केली होती. याबाबत त्याचवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली होती. मात्र, ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने हे बांधकाम पूर्ण झाले. ग्रा.पं.च्या या बेजबाबदारपणाबद्दल तालुका लोकशाही दिन व जिल्हा लोकशाही दिनात तक्रार केली. मात्र उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे कोकण आयुक्तांकडे दाद मागण्यात आली. त्यांनी याबाबत निर्देशही दिले. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीवरच कारवाई करावी, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
छाया बावीस्कर यांचे उपोषण
देवजी आवडोजी साठे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून मर्जीतील माणसांना हाताशी धरून मूळ मालकाच्या संमतीशिवाय जबरदस्तीने घरात नळ व वीज जोडणी घेतल्याचा आरोप छाया बावीस्कर यांनी केला आहे. रखवालदार म्हणून राहत असलेला माणूस आमच्या मालकीच्या घरात राहून बेकायदेशीर बांधकामही करत असल्याचा आरोपही बावीस्कर यांनी केला. वेेंगुर्ले नगरपालिकेने दिलेल्या ना हरकत दाखल्यातही मालकाने तक्रार केल्यास नगरपरिषद जबाबदार नसल्याचा उल्लेख केला आहे. घराच्या ताब्याबाबत वेंगुर्ले दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल आहे. मात्र, अनेकवेळा तक्रार अर्ज देऊनही प्रशासन न्याय देत नसल्याने उपोषण छेडत असल्याचे बावीस्कर यांनी सांगितले.