आचरा येथील हार्डवेअर दुकानाला भीषण आग, साहित्य जळून खाक
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 12, 2024 16:47 IST2024-11-12T16:46:50+5:302024-11-12T16:47:27+5:30
आचरा : आचरा मालवण रस्त्यावर हुतात्मा स्मारकनजीक भक्ती हार्डवेअर इलेक्ट्रीक दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील ...

आचरा येथील हार्डवेअर दुकानाला भीषण आग, साहित्य जळून खाक
आचरा : आचरा मालवण रस्त्यावर हुतात्मा स्मारकनजीक भक्ती हार्डवेअर इलेक्ट्रीक दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील साहित्य अक्षरशः जळून खाक झाले. आगीमुळे स्लॅबच्या इमारतीलाही तडे गेले असून मोठे नुकसान झाले.
पहाटे मॉर्निंगवॉकला जाणारे भोसले यांना या दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी दुकान मालक विनोद गवळी व स्थानिकांना माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू केले होते. दरम्यान, मालवण नगरपालिकेचा अग्निशमनबंब घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावाधामुळे मोठी हानी टळली.
दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुमारे सव्वा कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालक विनोद गवळी यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.