सिंधुदुर्गात मुसळधार
By admin | Published: June 7, 2015 12:42 AM2015-06-07T00:42:35+5:302015-06-07T00:46:18+5:30
दरड कोसळली : करूळ घाटात वाहतूक विस्कळीत
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यासह विविध भागात शनिवारी सायंकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. कणकवली शहरात सायंकाळी ६ वाजता मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसाने तब्बल दोन तासांनी काहीशी उघडीप दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता, तर वैभववाडी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. करूळ घाटात दरड कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, रात्री ८.३0 वाजता ही वाहतूक सुरळीत झाली.
सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. कणकवलीत ४ वाजल्यापासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ च्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तब्बल दोन तास झालेल्या पावसाने सखल जागेत पाणी साचले होेत, तर पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट आदी साहित्य नसल्याने अनेक नागरिकांना बाजारपेठेतील दुकानांमध्येच अडकून पडावे लागले. रात्री आठच्या सुमारास पाऊस कमी झाल्यानंतर या नागरिकांना दिलासा मिळाला. शहरातील वीजप्रवाह काही काळ खंडित झाला होता. नांदगाव, तळेरे, फोंडाघाट, आदी भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, या पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात झालेली नव्हती. काहीशी उसंत घेतलेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता. (वार्ताहर)
दोन तास वाहतूक ठप्प
शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ६.३०च्या सुमारास करूळ घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती. कोसळलेल्या दरडीमुळे वाहनांना अपघात होऊ नये म्हणून पोलीस कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणी हजर होते. रात्री ७.४५च्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू झाले. यावेळी वाहतूक थांबविली होती. रात्री ८.३०नंतर करुळ घाटातील वाहतूक सुरळीत झाली.