हरकुळ बुद्रुक खुनप्रकरणी मुजफ्फर पटेल याला ६ दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:44 AM2019-06-13T11:44:18+5:302019-06-13T11:45:43+5:30
कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख याच्या खुनप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी मुजफ्फर आदमशहा पटेल याला बुधवारी पोलिसांनी कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १७ जून पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख याच्या खुनप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी मुजफ्फर आदमशहा पटेल याला बुधवारी पोलिसांनी कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १७ जून पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुजफ्फर पटेल याने किरकोळ वादातून सोमवारी रात्री अफजल शेखचा खून केला होता. मंगळवारी मुजफ्फरला पोलिसांनी अटक केली होती. त्याला बुधवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पुढील तपासासाठी न्यायालयाजवळ सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली.
मुजफ्फर याने अफजल शेख याचा खून करण्यासाठी वापरलेले धारधार शस्त्र ताब्यात घ्यायचे आहे. मुजफ्फर याला खुन करण्यासाठी आणखीन कोणी सहाय्य केले आहे का? त्याचा शोध घ्यायचा आहे. खुनाच्या रात्री मुजफ्फरला पळण्यासाठी कोणी मदत केली का? खुनामागे अन्य कोणती कारणे आहेत का? अशा विविध विषयांबद्दल तपास करण्यासाठी कणकवली पोलीसांनी सात दिवस आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने त्याला १७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या खून प्रकरणामुळे कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू अचानक कसे बनले ? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करीत आहेत.