हळदिकुंकू वाणावरून नारिशक्ती एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:09 PM2019-01-31T18:09:35+5:302019-01-31T18:12:21+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वत्र राबविण्यात येत असलेल्या उत्कर्षा अंतर्गत महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून नांदगाव ग्रामपंचायतीच्यावतीने हळदीकुंकू समारंभाला वाण म्हणून सॅनिटरी पॅड सरसकट किशोरवयीन मुलींपासून ते वयोवृध्द महिलांनाही वाटप करण्यात आले. त्यामुळे नांदगाव मधील महिला संतप्त झाल्या असून त्यांनी नांदगाव ग्रामपंचायतीवर धडक मारली. यावेळी सरपंच यांना जाब विचारत याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग : जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वत्र राबविण्यात येत असलेल्या उत्कर्षा अंतर्गत महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून नांदगाव ग्रामपंचायतीच्यावतीने हळदीकुंकू समारंभाला वाण म्हणून सॅनिटरी पॅड सरसकट किशोरवयीन मुलींपासून ते वयोवृध्द महिलांनाही वाटप करण्यात आले. त्यामुळे नांदगाव मधील महिला संतप्त झाल्या असून त्यांनी नांदगाव ग्रामपंचायतीवर धडक मारली. यावेळी सरपंच यांना जाब विचारत याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग अंतर्गत उत्कर्षा योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फक्त किशोरवयीन मुली व महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्यमान सुधारणेबाबत मार्गदर्शन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करून त्यांना वान म्हणून सॅनिटरी पॅड वाटप करण्यात यावेत असे सूचित करण्यात आले. विशेष म्हणजे नांदगाव ग्रामपंचायतीने याबाबत कहर करत सरसकट किशोरवयीन मुलींपासून वयोवृद्ध महिलांनाही सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आल्याने महिला संतप्त झाल्या.
वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत स्तरावर आयोजित हळदिकुंकु कार्यक्रमात सॅनिटरी पॅडच्या पॅकेटचे वाटप करण्यात यावे असे नमूद केल्याने हळदिकुंकू कार्यक्रमावेळी नांदगाव ग्रामपंचायतच्या मासिक बैठकित ठरल्याप्रमाणे वाण म्हणून या सॅनिटरी पॅड शिवाय प्रत्येकाला १ श्रीफळ वाटप करण्याचे ठरले. त्याप्रमाणे ४०० श्रीफळ खरेदी करण्यात आले होते. हे श्रीफळ त्या कार्यक्रमात वाटप करण्यात येणार होते. मात्र, नांदगाव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांनी हळदीकुंकू साठी आलेल्या सरसकट सर्व महिलांना फक्त सॅनिटरी पॅडचेच वाटप करा व श्रीफळ वाटू नका असे सांगीतल्याचे ग्रामपंचायत येथे या कृतीचा निषेध करण्यासाठी जमलेल्या महिलांकडून समजले.
याबाबत नांदगांव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी तुमच्या भावना मी समजू शकते यात तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता असे आलेल्या सर्व महिलांना सांगत शासनस्तरावरून आलेल्या परिपत्रकाबाबत माहिती देवून त्याच्या प्रति दिल्या आणि या संदर्भात पंचायत समिती सदस्या वाळके यांचे म्हणने आपण शनिवारी (२ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता या विषयांवर चर्चा करून निर्णय घेवू, असे सांगितले.
शनिवारी याबाबत चर्चा
नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्व महिलांना हळदीकुंकू समारंभाला सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. यावेळी निवेदन देत महिलांचा झालेल्या अपमानाबद्दल निषेध व्यक्त केला. हा सर्व प्रकार पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके यांच्या समक्ष झाल्याने त्या आल्यानंतर याबाबत खास सभा लावून चर्चा करण्यात येणार असल्याचे सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी सांगितले.