कोकणातील पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 05:38 AM2020-11-15T05:38:00+5:302020-11-15T05:40:02+5:30
Tourist: पर्यटकांकडून विचारणा : वातावरण होतेय आल्हाददायक
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग : कोकणातीलपर्यटनाचा उन्हाळी हंगाम ठप्प झाला असला, तरी आता नोव्हेंबर महिना सुरू होताच पर्यटनाच्या हिवाळी हंगामाला सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. तसेच आता वातावरणही आल्हाददायी होत असल्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.
२३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले होेते. यावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे अशा सर्वच स्थळांवर बंदी घातली होती. कोरोनाची भीती आणि बंदी यामुळे पर्यटकांनी गेल्या आठ महिन्यांपासून या सर्वच स्थळांकडे पाठ फिरविली होती.
मात्र, आता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन वाढत आहे. काही महिन्यांपासून घरातच राहिलेले पर्यटक हळूहळू पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत.
पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटक प्राधान्य देत असून या निवासस्थानांचे आरक्षण सुरू झाले आहे. आताच सुमारे ४० टक्के निवासस्थानांचे आरक्षण झाले आहे. त्यामुळे हा हंगाम चांगला जाईल, असा विश्वास पर्यटन विकास महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण कोकणात पर्यटनाला चांगली सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या अनुंषगाने योग्य ती खबरदारी एमटीडीसीकडून घेतली जात आहे. - दीपक माने, प्रादेशिक
व्यवस्थापक, पर्यटन विकास महामंडळ, कोकण विभाग
व्यवसाय वाढीची अपेक्षा
पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवसायातील ६० टक्के व्यवसाय हा उन्हाळी हंगामात होत असतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उन्हाळी पर्यटन थांबल्यामुळे हा व्यवसाय केवळ २५ ते ३० टक्केच झाला. त्यामुळे पर्यटन महामंडळाला हिवाळी पर्यटन चांगले जाईल, अशी आशा वाटत आहे.