Hasan Mushriff : 'डोनाल्ड ट्रम्पपेक्षा लोकप्रिय माणूस फडणवीसांनी शोधून दाखवावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 06:12 PM2021-04-20T18:12:01+5:302021-04-20T18:12:56+5:30
मंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवारी कोल्हापूरहून गोव्याकडे जात असता सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला.
सावंतवाडी : अभिनेता सुशातसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून आता रेमडीसीविर औषध पुरवठयावरून महाविकास आघाडी सरकाराला अस्थीर करण्याचा भाजपच्या कटाचा हा एक भाग असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच माझी लोकप्रियता एक महिलेशी करणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शोभते का असा सवालही त्यांनी उपस्थित करत डोनाल्ड ट्रम्पपेक्षा लोकप्रिय माणूस तरी शोधून काढावा असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
मंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवारी कोल्हापूरहून गोव्याकडे जात असता सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, रेमडीसीविर या इंजेक्शनवरून भाजपची काही मंडळी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करत आहे. या इंजेक्शनचा साठा करून ठेवून तो भाजपच्या माध्यमातून वाटण्याचाच हा प्रयत्न होता. पण, तो महाविकास आघाडी सरकारने मोडीत काढला. त्यामुळेच कुठलेही प्रकरण उकरून काढून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे असाच कट भाजपने चालवल्याचे दिसून येते.
मी केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांच्यावर जी टिका केली त्यावर आजही ठाम आहे. त्यांना गावात गेल्यावर पाच माणसे तरी ओळखतात का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी माझी तुलना एका स्त्रीच्या लोकप्रियतेवर करणे योग्य नाही. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प पेक्षा लोकप्रिय माणूस शोधून काढला पाहिजे होता, असा सल्लाही यावेळी मुश्रीफ यांनी दिला.
राज्यात कडक लॉकडाउन करणे गरजेचे असून, कोरोनाची साखळी तुटली पाहिजे म्हणून सरकार खबरदारी घेत आहे. सरकारने कोरोना काळात मोठे पॅकेज दिले आहे. पण, जे घटक यातून राहिले आहेत, त्यांच्यासाठी ही सरकार काही तरी विचार करेल असे यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. येत्या काळात आक्सिजनचा मोठा साठा राज्याला लागणार आहे. रूग्णसंख्या वाढत आहे. मात्र, ऑक्सिजनचा साठा तयार करण्यासाठी योग्य ती पाऊले सरकारच्या माध्यमातून उचलली जात आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र कोरोनाची तिसरी लाट ही येणार आहे, असे तज्ञ सांगत असून सर्वांनी एकत्रपणे कोरोनाचा सामना करणे गरजेचे आहे. सरकार ही आपल्या माध्यमातून सर्व उपाययोजना करत असून, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक आहे. मात्र, सरकार योग्य सामना करेल आता माणसे जगवणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.