हातीपमध्ये चक्क तळीच गेली चोरीला, तक्रार दाखल

By admin | Published: February 12, 2015 11:58 PM2015-02-12T23:58:39+5:302015-02-13T00:49:40+5:30

दापोली तालुका : संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना सापडली वादात

Hateep stole the money and stole it, filed a complaint | हातीपमध्ये चक्क तळीच गेली चोरीला, तक्रार दाखल

हातीपमध्ये चक्क तळीच गेली चोरीला, तक्रार दाखल

Next

दापोली : तालुक्यातील हातीप- बौध्दवाडी येथे चोरीची घटना घडली आहे. मात्र, यावेळी सोने-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम चोरीला गेलेली नाही तर संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योेजनेतून सन २००२-०३मध्ये बांधलेली तळी चोरीला गेली आहे. या गमतीशीर पण तितक्याच संतापजनक परिस्थितीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
हातीप - बौध्दवाडीमध्ये सन २००२-०३ मध्ये बांधण्यास घेतलेल्या तळी बांधकामाची चौकशी करण्याची मागणी जान्हवी गोडबोले आणि ग्रामस्थांनी केली होती. यापूर्वी या तळीच्या बांधकामाची पंचायत समिती स्तरावरून पाहणी करण्यात आली होती. १४ जानेवारीला प्रत्यक्ष जागेवर जाऊन ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह पंचांसमक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये सर्व्हे नं. ७२ व हिस्सा नं. १४ या जागेत तळीचे बांधकाम केल्याच्या कोणत्याही स्वरूपाच्या खुणा आढळलेल्या नाहीत.
तसेच या जागेवर सद्यस्थितीत खोदाई अथवा बांधकाम न झाल्याचा निर्वाळा जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपअभियंत्यांनी पाहणीत काढला आहे. तळीच्या केलेल्या मूल्यांकनाची पडताळणी करण्यासाठी ग्रामसेवकांकडे मोजमाप वहीची व अंदाजपत्रकाची मागणी करण्यात आली होती. मात्र, मोजमाप वही ठेवण्यात आली नसून, अंदाजपत्रकाची प्रत, खर्ची घालण्यात आलेल्या मस्टर व साहित्याची व्हाऊचर्स दाखवण्यात आली. मात्र, मोजमाप वही उपलब्ध नसल्यामुळे मस्टर व साहित्य व्हाऊचर याची पडताळणी करण्यात आलेली नाही. यामुळे केलेले मूल्यांकन नेमके कसले करण्यात आले, हे गुलदस्त्यात राहिले आहे.
पाहणीमध्ये ज्या जागेवर तळी बांधल्याचे ग्रामपंचायतीकडून नमूद करण्यात आले होते, त्या जागी सद्यस्थितीत खोदाई अथवा बांधकाम केल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. तक्रारदार जान्हवी गोडबोले आणि गजानन सागवेकर यांनी प्रत्यक्षात तळीचे बांधकामच न झाल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.
उपसरपंच बळीराम होडबे यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी आपण कायमस्वरूपी मुंबईत वास्तव्यास असल्याने आपणास माहीत नसल्याचे सांगितले. बौध्दवाडीतील ग्रामस्थ जितेंद्र पवार यांनी सन २००२-0३ मध्ये चौकोनी आकारात ७ ते ८ फूट खोलीचे तळीचे खोदकाम करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, लांबी व रूंदी नक्की सांगण्यात असमर्थता दर्शवली. पाहणीमध्ये येथे तळी नक्की बांधली की नाही, हे मोजमापवहीसमोर आलेले नाही.
पाहणीप्रसंगी तक्रारदार जान्हवी गोडबोले, गजानन सागवेकर, उपसरपंच बळीराम होडबे, ग्रामस्थ जितेंद्र पवार, ग्रामपंचायत शिपाई संजय शेडगे, ग्रामसेवक अशोक शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता आर. अ‍े. देसाई, शाखा अभियंता दि. अ. धारप आदी उपस्थित होते. मात्र, सरपंचांना उपस्थित राहण्याबद्दल कळवल्यानंतरही संबंधित सरपंच उपस्थित न राहिल्याने तळीचे गौडबंगाल कायम राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hateep stole the money and stole it, filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.