सिंधुदुर्गातील मुणगे गावात आढळला 'हाऊचरा माळढोक' पक्षी, वनविभागाने घेतला ताब्यात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 11, 2022 07:06 PM2022-11-11T19:06:29+5:302022-11-11T19:06:51+5:30
हा पक्षी त्याच्यावर असलेल्या बिल्ल्यावरून अबुधाबी येथून सोडलेला असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे.
देवगड (सिंधुदुर्ग): तालुक्यातील मुणगे गावामध्ये सापडलेल्या अबुधाबी येथून आलेल्या पक्ष्याचे गूढ उलगडले आहे. हा पक्षी ‘हाऊचरा माळढोक’ या जातीचा असून, प्रजनन कालावधीतील प्रवास समजण्यासाठी त्याच्या पायात रिंग अडकवून त्याला सोडण्यात आले होते. याबाबतची माहिती मानद वन्यजीव संरक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी दिली आहे. आता हा पक्षी वनविभागाच्या ताब्यात आहे.
या पक्ष्याला अबुधाबीतून राजस्थानमार्गे पाकिस्तानला जायचे असून, वाटेत तो मुणगे येथे थांबला असताना सापडला. याबाबत राजस्थान राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून या पक्ष्याला पुढील प्रवासासाठी सोडायचे का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बांबुळकर यांच्या घराजवळच्या बागेत गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एक विदेशी पक्षी आढळला. या पक्ष्यावर असलेल्या बिल्ल्यावरून त्याला अबुधाबी येथून सोडण्यात आले असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे.
बिल्ल्यावरून पक्ष्याला अबुधाबी येथून सोडल्याचे स्पष्ट
हा पक्षी निदर्शनास येताच संजीवनी बांबुळकर यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर वनपाल सादिक फकीर, वनरक्षक नीलेश साठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी हा राखाडी रंगाचा विदेशी पक्षी ताब्यात घेतला. तो कोणत्या जातीचा आहे, याबाबत स्पष्ट झाले नाही. परंतु, हा पक्षी त्याच्यावर असलेल्या बिल्ल्यावरून अबुधाबी येथून सोडलेला असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. मानद जीवरक्षक प्रा. नागेश दप्तरदार यांनी यासंदर्भात बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीशी संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केली आहे. तसेच येत्या दोन दिवसात याबाबत अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले