पदे घेताना घुसमट झाली नाही का?
By admin | Published: February 2, 2015 11:02 PM2015-02-02T23:02:33+5:302015-02-02T23:48:02+5:30
कॉंग्रेसचा पडतेंना सवाल : सदस्य संख्या बघूनच शिवसेनेत प्रवेशाचा आरोप
कुडाळ : काँग्रेस नेते नारायण राणे यांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय पडते यांना वेळोवेळी मोठी पदे, जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. तरीही पक्षात घुसमट होते, असे कारण सांगून ते बाहेर पडतात, हे आश्चर्य आहे. त्यांनी हा पक्षबदल कुडाळ ग्रामपंचायतीतील सदस्यांची संख्या बघूनच केला आहे, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी साळगावकर म्हणाले, काँग्रेस पक्षात घुसमट झाली असे म्हणणाऱ्या संजय पडते यांना नारायण राणे व पक्षाने एसटी महामंडळ संचालक, शिवसेना जिल्हाप्रमुख,जिल्हा परिषद अध्यक्ष, विधान सभा निवडणुकीत कुडाळ मतदार काँग्रेसचे प्रचारप्रमुख अशी पदे आणि मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. पक्षात नवीन आलेल्यांना सांभाळून घ्यावे लागते. जुन्यांनी त्याबाबत गैरसमज करू नये. येथील सरपंच दोन वर्षांनंतर बदलावा,हे अगोदरच ठरले होते. कालावधी संपल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सहा महिन्यांअगोदर राजीनाम्याचे तोंडी आणि नंतर लेखी आदेश कुडाळ सरपंचांना दिले होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ उपसरपंच विनायक राणे, आनंद शिरवलकर, सुनील भोगटे, विकास कुडाळकर, अस्मिता बांदेकर, अनिल खडपकर व काँगे्रेसचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पडते यांनी अँब्युलन्स विकली : राणे
संजय पडते मित्र मंडळ स्थापन करून आमच्यासारख्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन जनतेसाठी विकत घेतलेली अॅम्ब्युलन्स पडते यांनी कोणालाही न सांगता विकली, असा आरोप विनायक राणे यांनी केला.
हिंमत असेल, तर राजीनामा द्या : सुनील भोगटे
जर खरोखरच घुसमट होत आहे तर सरपंचांनी आपल्या सरपंच व सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, असा टोला सुनील भोगटे यांनी हाणला आहे. कॉँग्रेसप्रमाणे शिवसेनेतही गटबाजी करून शिवसेनेलाही पडते वेठीस धरतील. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत कुडाळ नेरूर येथील आपले सदस्यत्व राखू न शकलेले संजय पडते शिवसेना काय राखणार, असा टोलाही सुनील भोगटे यांनी लगावला. पडते यांच्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीच घुसमट होत होती. ती आता संपली आहे, असे विकास कुडाळकर यांनी सांगितले. मला तालुकाध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी संजय पडते यांनी नारायण राणे यांना सांगितले होते, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.