मास्क लावायला विसरला, कॉलरला धरुन पोलिसांनी फरफटत ओढून केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:10 IST2021-05-29T16:00:26+5:302021-05-29T16:10:37+5:30
CoronaVirus Crimenews sindhudurg police: वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारण नसताना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धमकी देऊन आपल्या कॉलरला धरुन फरफटत ओढून मारहाण केली. तसेच गळ्याला नखे लावून दुखापत केली असा आरोप करत वेंगुर्ला येथील व्यावसायिक आदित्य हळदणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

मास्क लावायला विसरला, कॉलरला धरुन पोलिसांनी फरफटत ओढून केली मारहाण
सिंधुदुर्ग : वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारण नसताना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धमकी देऊन आपल्या कॉलरला धरुन फरफटत ओढून मारहाण केली. तसेच गळ्याला नखे लावून दुखापत केली असा आरोप करत वेंगुर्ला येथील व्यावसायिक आदित्य हळदणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
आदित्य सुभाष हळदणकर याने दिलेल्या तक्रार वजा निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २४ मे २०२१ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास मी व माझा मित्र त्याच्या रामेश्वर मंदीर शेजारील घरा समोर उभ्या असलेल्या त्यांच्या चार चाकी गाडीमध्ये बसलो असताना एक पोलिस हे गाडी जवळ आले व गाडीची काच खाली करण्यास सांगितली व पोलीस निरीक्षक यांनी तुम्हाला तत्काळ बोलावले आहे असे सांगितले.
मी लगेचच गडबडित मास्क विसरून गाडीकडे गेलो असता तानाजी मोरे यांनी मला तुझे मास्क कोठे आहे? असे विचारले, त्यावर मी त्यांना असे सांगितले की, साहेब मास्क गाडीमध्ये आहे, ताबडतोब ये असे सांगितल्याने मी आलो, त्यामुळे मास्क लावायला विसरलो, थांबा मी लगेच मास्क लावून येतो. त्यावर मोरे यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरले व माझ्या शर्टच्या कॉलरला पकडून मला फरफटत गाडीमध्ये बसविण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी माझ्या गळ्याला त्यांची नखेही लागली. तरी देखील ते मला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतो, मी पोलिस निरीक्षक आहे. कोणी माझे काहीही करू शकत नाही असे सांगितले.
दरम्यान या प्रकारामुळे मी भयभीत झालेलो असून पोलिस निरीक्षक तानाजी मोरे हे आपल्या पदाचा गैरवापर करून माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून माझ्या जिवाचे काहीतरी करण्याच्या इराद्यात आहेत. त्यांच्या पासून माझ्या जिवाला धोका आहे.त्यामुळे माझे काही बरेवाईट झाल्यास त्यास देखील तानाजी मोरे हे सर्वस्वी जबाबदार राहतील. मी प्रचंड मानसीक तणावाखाली आहे. तानाजी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अशा प्रकारे मागणी आदित्य हळदणकर याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.