दुर्दम्य आशावादावर त्यांनी दिली ५००० व्याख्याने
By admin | Published: March 30, 2015 10:32 PM2015-03-30T22:32:30+5:302015-03-31T00:21:53+5:30
चंद्रकांत देवलाटकर : अंधाने बदलले साहित्यातून स्वत:चे, वाचकांचे विश्व, जगण्याचे गाणे
अमोल पवार - आबलोली --अंध असूनही शालेय क्रमिक पुस्तकांवर डोळसपणे व्याख्याने देणारे आणि आपल्या प्राप्त अनुभवांना साहित्यरुपाने वाचकांसमोर ठेवणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत सीताराम देवलाटकर. धामापूरतर्फ संगमेश्वर येथील या अवलियाने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजपर्यंत सुमारे ५००० व्याख्यानांचे कार्यक्रम तसेच चार वार्षिकांक प्रसिद्ध केले आहेत.
शालेय पाठ्यपुस्तकांमधील भाषा विषय, त्यातील व्याकरण आणि लेखन हे त्यांच्या व्याख्यानाचे विषय. आपले शिक्षण बारावीपर्यंत झाले. मात्र, त्याचवर्षी सर्पदंशाने आपली दृष्टी गेली आणि तेव्हापासून आजतागायत आपण दुसऱ्यांकडून वाचून लिहून घेत आहोत. अनेक नवीन कवितांना चाली लावणे, पद्यातील अलंकारिकता, गद्याचे वेगळेपण, लेखनकौशल्य, भाषणकौशल्य इत्यादी विषयावर देवलाटकर हिरीरीने बोलतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांमधून त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी त्यांना कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. केवळ व्याख्यानांवर न थांबता देवलाटकर यांनी चित्रांगी, रत्नपारखी, स्वयंसिद्ध, मानी मराठा हे चार विशेषांक सिद्धी प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहेत. आपल्या साहित्य लेखनासाठी मुलगी चारुलता, मुलगा चिंतामणी मदत करत असल्याचे देवलाटकर यांनी सांगितले.
आपण एकपाठी असून, एखाद्याकडून वाचून घेतलेले साहित्य आपल्या चांगले लक्षात राहाते असे ते म्हणतात. पत्नीच्या निधनानंतर आपण खचलो. मात्र, तिच्याच आठवणीने आपण लेखन करुन घेतो. ॐ निसिनंदन चंद्रकांत, स्वरचंद्रन, चित्रकांत, चिद्रातंदीचंद्र आदी नावानी त्यांनी संगीतकार, नाटककार, विडंबनकार म्हणून लेखन केले आहे. आपल्या जीवनाविषयी देवलाटकर म्हणतात, आपले जीवन म्हणजे अक्रोडाचे झाड आहे.
ज्याप्रमाणे अक्रोडाला १०० वर्षांनंतर फळे येतात म्हणून झाड लावायचं सोडायचं का? हाच प्रतिप्रश्न समोरच्या व्यक्तीला अंतर्मुख करायला लावतो. देवलाटकरांचे हे व्याख्यान, लेखन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आजच्या पिढीसाठी देवलाटकर यांचं प्रसन्न जगणं आणि त्यातून नवनिर्मितीचा छंद निश्चितच अपेक्षा वाढविणारा आहे.
अंध असूनही देत आहेत क्रमिक पुस्तकांवर व्याख्याने.
चार वार्षिकांक, भाषा, व्याकरण, पाठ्यपुस्तके यांच्यावर केले प्रेम.
केवळ एखाद्या ठिकाणावर जाण्यासाठी घ्यावा लागतो एखाद्याचा आधार.