‘तो’ खून मुलाकडूनच
By admin | Published: June 28, 2015 11:29 PM2015-06-28T23:29:21+5:302015-06-28T23:29:21+5:30
न्हावेलीतील घटना : कबुली दिली; संशयिताला अटक
सावंतवाडी : न्हावेली-विवरवाडी येथील पास्तू किस्तू फर्नांडिस (वय ५५) या वृद्ध पित्याचा खून संशयित म्हणून ताब्यात घेतलेला मुलगा सालू फर्नांडिस यानेच केल्याचे तपासात पुढे आले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या दोघांच्या झटापटीत सालू याने वडिलांना भिंतीवर आदळले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. सालू याला पोलीस आज, सोमवारी येथील न्यायालयात हजर करणार आहेत.न्हावेली-विवरवाडी येथील पास्तू फर्नांडिस यांचा शुक्रवारी रात्री गूढ मृत्यू झाला होता. या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नव्हते. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनानंतर पास्तू यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी शनिवारी मृत पास्तू यांचा मुलगा जॉकी फर्नांडिस याच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हाही दाखल केला होता. तसेच चौकशीसाठी पास्तू यांचा मोठा मुलगा सालू याला ताब्यात घेतले होते, पण रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते.शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास वडील पास्तू मद्यपान करून आले होते. त्यांनी सालूची गळपट्टी धरली. त्यावेळी दोघात झटापटही झाली होती. यात सालूने वडिलांना दरवाजावर आदळले. भिंतीवरही जोरदार आपटले. यात पास्तू यांच्या डोक्याला व तोंडाला जखम झाली. सकाळी उठून वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला असता वडील मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. मृत पास्तू यांना चार मुलगे व चार मुली असा परिवार असून, सालू हा सर्वांत मोठा मुलगा आहे, तर दुसरा मुलगा जॉकी हा गोव्यात कामाला असतो. मृत पास्तू यांची पत्नी आजारी असून ती घरातच आहे. पोलिसांनी सालू याला ताब्यात घेतले आहे. त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
रेड्यावरील उपचारावरून वाद
रविवारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी घटनेची कसून चौकशी करीत सालू याला पुन्हा ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपली वडिलांशी झटापट झाली होती, अशी कबुली दिली. चार दिवसांपूर्वी गोठ्यातील रेड्याला वडिलांनी धारदार हत्याराने मारले होते. त्यामुळे रेड्याच्या पायाला दुखापत झाली होती. सालू याने रेड्यावर उपचार करण्यासाठी वैदू आणला होता. या वैदूला वडिलांनी, तू रेड्याला बरा करू नकोस, मी त्याला पुन्हा मारणार, अशी धमकी दिली होती. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.