नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची उत्सुकता

By admin | Published: October 7, 2015 11:47 PM2015-10-07T23:47:16+5:302015-10-08T00:30:05+5:30

आज निवड : संदेश पारकर गटाची बंडखोरी कायम

Head of the city | नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची उत्सुकता

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची उत्सुकता

Next

कणकवली : कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरुन अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमधील संदेश पारकर गटाकडून माधुरी गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर बंडखोरी केल्याबद्दल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी त्याना नोटिस पाठवून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाही माधुरी गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले दोन्ही उमेदवारी अर्ज बुधवारी मागे न घेतल्याने गुरुवारी या पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष निवडही होणार आहे. मात्र, या निवडणुकीच्या अनुषंगाने संदेश पारकर आणि समीर नलावडे गटात संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही गटाकडून आपला नगराध्यक्ष बसावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस विरुद्ध संदेश पारकर गट असे काहीसे वातावरण या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाले आहे. त्यातच संदेश पारकर काँग्रेस सोडून अन्य पक्षात जाणार अशी चर्चा ही कणकवली शहरासह जिल्ह्यात सुरु आहे.
निवडणूक प्रक्रियेप्रमाणे ३ आॅक्टोबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. या दिवशी काँग्रेसमधील दोन गटाकडून वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. समेटासाठी बैठकाही झाल्या. मात्र तोडगा निघू शकलेला नाही. काँग्रेसमध्ये बंडखोरी करीत संदेश पारकर गटाकडून माधुरी गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेल्या सुविधा साटम किंवा बंडखोरी केलेल्या माधुरी गायकवाड यांच्यापैकी कोणीही अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे पक्ष माधुरी गायकवाड यांच्यावर आता काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज असल्याने ८ आॅक्टोबर रोजी निवडणूक अटळ आहे. त्यामुळे १७ नगरसेवकांमधून ९ नगरसेवकांचे बहुमत मिळविण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वीच आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच आपले बहुमत टिकून राहण्यासाठी त्यांनी रणनिती आखली आहे. जे नगरसेवक काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुविधा साटम यांना मतदान करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गुरुवारी नेमके काय होणार याची उत्सुकता नागरिकांना आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडून उपनगराध्यक्ष पदाची संधी कोणाला दिली जाणार? बंडू हर्णे यांची वर्णी लागणार का? याबाबतही नागरिकांकडून आडाखे बांधले जात आहेत. (वार्ताहर)

Web Title: Head of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.