सभागृहाला सील ठोकणे हा नगराध्यक्षांचा दळभद्रीपणाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2016 12:41 AM2016-05-20T00:41:52+5:302016-05-20T00:44:11+5:30
विनायक राऊत यांच्याकडून समाचार : सभागृहातच सादरीकरण करण्याची सेना नगरसेवकांची भूमिका अयोग्य
रत्नागिरी : पालिकेच्या सभागृहाचेही काही नियम आहेत, सभागृहाचा मान प्रत्येकाने राखला पाहिजे. काहीही झाले तरी प्रेझेंटेशन सभागृहातच करणार, अशी काही नगरसेवकांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. त्याचबरोबर सील ठोकून नगरपरिषद सभागृह बंद ठेवणे, हा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचा वैचारिक दळभद्रीपणा असून, ही बाब दुर्दैवी आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी नगरपरिषदेत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत तीव्र नापसंती व्यक्त केली.
पाणी योजनेच्या सादरीकरणानंतर उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांच्या दालनात त्यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. येथे पक्षीय वादंगाचा प्रश्न मुळीच नाही. पाणीपुरवठा योग्यरित्या होणे, हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुबलक पाणी पुरवठा हवा, ही शहरवासीयांची मागणी आहे. रत्नागिरी हे भविष्यात अधिक विस्तारणारे शहर आहे. त्यामुळे योजना बनविताना लाखाची नव्हे; तर सव्वा ते दीड लाख लोकांसाठी बनवावी, अशी सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. शहरातील पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षात विस्कळीत आहे. पाणी वाटपातही अनियमितता आहे. मुबलक पाणी असूनही वितरण व्यवस्था ठप्प असल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे जो पाणी आराखडा तयार केला आहे, त्याची माहिती लोकप्रतिनिधींना व्हावी, म्हणून हा आराखडा पाहणीचा प्रपंच आहे. त्यातून आराखड्यातील त्रुटीही दूर करणे शक्य होणार आहे, असे खासदार राऊत म्हणाले.
प्रस्ताव शासनाकडे गेला असला तरी योजनेला सुकाणू समितीची मान्यता नाही. त्यातील त्रुटी दूर होऊन परिपूर्ण प्रस्ताव सुकाणू समितीसमोर जावा म्हणून आम्ही सूचना दिल्या आहेत. पानवलच्या धरणाचे पाणी ही दैवी देणगी आहे. धरणाची उंची वाढविणे आवश्यक आहे तसेच धरणाला मोठी गळती असून, ते पूर्णत: दुुरुस्त करण्याची गरज आहे. धरणातील गाळ उपसाही करावा लागेल. सध्या दीड मीटर उंची तात्पुरती वाढवली आहे. परंतु ती कायमस्वरुपी वाढवण्याची व्यवस्था करावी. योजनेत २१ दशलक्ष लीटर पाणी गृहीत धरण्यात आले आहे. शीळची जॅकवेल अधिक जवळ उभारली जाणार आहे. ११० किलोमीटर लांबीची जलवाहिनी ही न गंजणाऱ्या धातूची वापरली जाणार आहे. शहरात १५ ठिकाणी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ठेवून जनतेला माहिती दिली जाणार आहे. सूज्ञ नागरिकांकडून आणखी चांगल्या सूचना आल्यास त्यांचा आराखड्यात समावेश व्हावा, असेही अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या प्रश्नावरून सेनेने वातावरण भडकावण्याचे काम कधीही केलेले नाही. यावेळी सेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे, बंड्या साळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)